मुंबई: राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या थेट संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून २९ सप्टेंबर रोजी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत राज्यभर रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात येणार असून, नोकरी शोधणारे उमेदवार आणि विविध क्षेत्रांतील कंपन्या व नियोक्ते यांना एकाच व्यासपीठावर आणण्यात येणार आहे.(Rojgar Mahakumbh 2026)
रोजगार महाकुंभाच्या मुंबईतील उद्घाटन सोहळ्याचे आयोजन एसएनडीटी महिला विद्यापीठ येथे करण्यात आले असून, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, मंत्री श्री. चंद्रकांत पाटील, श्री. मंगल प्रभात लोढा, श्री. उदय सामंत, श्री. जयकुमार रावल, श्री. आकाश फुंडकर, महापौर श्रीमती रितू तावडे, खासदार श्री. मिलिंद देवरा व श्री. अरविंद सावंत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.(Rojgar Mahakumbh 2026)
या रोजगार महाकुंभाचे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य व अनुभवाला उपलब्ध रोजगाराच्या संधींशी जोडणे. उमेदवार आणि रिक्त पदांचे ‘कॅन्डिडेट–व्हॅकन्सी मॅचिंग’ करण्यासोबतच मुलाखतीची तयारी, संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि सॉफ्ट स्किल्स यासाठी प्री-प्लेसमेंट प्रशिक्षणही देण्यात आले आहे. या प्रशिक्षणाच्या पहिला टप्प्यातील बॅच ७ ते १० सप्टेंबरदरम्यान, तर दुसऱ्या टप्प्यातील बॅच २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. (Rojgar Mahakumbh 2026)
या व्यापक उपक्रमाचा विशेष भाग म्हणून एसएनडीटी महिला विद्यापीठात लाडक्या बहिणींसाठी स्वतंत्र रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सुमारे ६०० ते ७०० महिला उमेदवार सहभागी होणार असून, विविध कंपन्यांचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. महिलांना उपलब्ध पदे, पात्रता, कामाचे स्वरूप, वेतनश्रेणी आणि भरती प्रक्रियेची थेट माहिती मिळण्यासोबतच कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्याची व मुलाखती देण्याची संधी मिळणार आहे. महिलांच्या कौशल्याला रोजगाराच्या संधींशी जोडणे आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देणे हा या विशेष मेळाव्याचा उद्देश आहे.(Rojgar Mahakumbh 2026)