महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय; राज्यात चार नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करणार, ४७ नवीन अपर तहसीलदार कार्यालयांचीही निर्मिती!

    24-Sep-2026   
 Maharashtra Revenue Offices 2026
 
मुंबई (Maharashtra Revenue Offices 2026) : सर्वसामान्य जनतेला महसुलली सेवांचा लाभ जलद गतीने व्हावा, तसेच प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान व्हावे, यासाठी राज्यात ४७ नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू करण्यात येत आहेत. तसेच ४ नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयेही स्थापन केली जाणार आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला.
 
शासकीय कार्यालयांमधील कामकाजाचा वाढता व्याप, उपलब्ध अपुरा अधिकारी व कर्मचारीवृंद, तालुक्यांचे व जिल्ह्यांचे भौगोलिक अंतर, वाढती लोकसंख्या आणि वेगाने होणारे नागरीकरण विचारात घेऊन प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, नवीन कार्यालयांमुळे तहसील व जिल्हा प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध महसुली सेवा नागरिकांना त्यांच्या अगदी जवळ व सुलभपणे उपलब्ध होतील. (Maharashtra Revenue Offices 2026)
 
चार जिल्ह्यांमध्ये नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये
 
प्रशासकीय विकेंद्रीकरणाला गती देण्यासाठी राज्यातील चार प्रमुख जिल्ह्यांमध्ये चार नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नागपूर जिल्ह्यातील नागपूर (ग्रामीण) येथे नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे. (Maharashtra Revenue Offices 2026)
 
राज्यातील २१ जिल्ह्यात ४७ नवीन अपर तहसीलदार कार्यालय
 
राज्यातील गडचिरोली, भंडारा, वर्धा, नागपूर, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नांदेड, लातूर, परभणी, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नंदूरबार, नाशिक, कोल्हापूर, सातारा, पुणे, पालघर, मुंबई उपनगर या २१ जिल्ह्यांत ४७ नवीन अपर तहसीलदार कार्यालये स्थापन करण्यात येणार आहे.
 
"राज्यातील तळागाळातील, ग्रामीण व दुर्गम भागातील सर्वसामान्य नागरिकांना महसुली सेवांचा लाभ अत्यंत सुलभ आणि गतिमान पद्धतीने मिळावा, यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. प्रशासन खऱ्या अर्थाने लोकाभिमुख करण्यासाठीच आपण राज्यात ४७ नवीन अपर तहसीलदार कार्यालये आणि ४ नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.”- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Maharashtra Revenue Offices 2026)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर