वाशिम (Maharashtra Drought Trigger One) : अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या संकटाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि.२४ सप्टेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावरच आपल्या दुष्काळ संहितेनुसार ट्रिगर वनप्रमाणे पहिला जो काही दुष्काळ जाहीर करायचा शासन आदेश उद्याच काढला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून मुख्यमंत्री फडणवीसांनी पीक व पाणी परिस्थितीचा आढावा घेतला आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने मदत दिली जाईल, अशी ग्वाही दिली. मुख्यमंत्र्यांनी म्हसला (ता. कारंजा), मोहगव्हाण (ता. मंगरुळपीर) आणि जऊळका (ता. मालेगाव) या गावांना भेट देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. (Maharashtra Drought Trigger One)
कमी पर्जन्यमानामुळे सोयाबीन, तूर यांसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. “शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. शासन त्यांच्या पाठीशी आहे. जास्तीत जास्त मदत केली जाईल,” अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
कमी पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावलेले आहे. आज वाशिम जिल्ह्यातील मोहगव्हाण येथे शेतीच्या नुकसानीची पाहणी करून शेतकरी भगिनींशी संवाद साधला. त्यांच्या व्यथा ऐकल्या. संकट कितीही मोठे असो, राज्य शासन कास्तकारांच्या पाठीशी राहील, हा विश्वास दिला.#Maharashtra#Washim#FarmerWelfarepic.twitter.com/mmvpU6Lkp1
वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी अमरावती विभागाची बैठक घेतली. अमरावती विभागामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळाची झळ पोहोचलेली आहे. सगळीकडेच पिकांची परिस्थिती अतिशय खराब आहे. विशेषता सोयाबीन असेल, काही भागातला कापूस असेल त्या ठिकाणी उडीद असेल, तूर असेल सगळ्या पिकांवर एक संकट पाहायला मिळत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले. (Maharashtra Drought Trigger One)
आपल्या दुष्काळ संहितेच्या अनुसार ट्रिगर वनप्रमाणे पहिला दुष्काळ जाहीर करायचा शासन आदेश आहे तो उद्या आम्ही काढणार आहोत. कदाचित त्याच्यामध्ये काही जर दुष्काळी भाग एखादा सुटला तर त्या संदर्भात ट्रिगर थ्रीच्या माध्यमातून ग्राउंड ट्रुथिंग आम्हाला करता येते. ते करून त्याचा समावेश आम्ही करू. पण सुकृत दर्शनी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुष्काळ दिसतोय अशा सगळ्या भागात दुष्काळ जाहीर करण्याच्या संदर्भातली कारवाई करणार आहोत अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. (Maharashtra Drought Trigger One)
दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या भागाची पाहणी, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, आवश्यक उपाययोजना यांसह विविध विषयांवर माध्यमांशी संवाद.
विशेषतः चारा-पाण्याची टंचाई या संदर्भातली कारवाई करण्यात येईल. कुठेही अन्नधान्याची कमतरता पडू नये या संदर्भातली मदत करण्यात येईल. काही ठिकाणी हेक्टरी थेट मदत करण्यात येईल. मुलांच्या शिक्षणांमध्ये खंड पडू नये म्हणून उपाययोजना करण्यात येईल. हे सगळं करत असताना ज्या भागामध्ये पाणी उपलब्ध होईल त्या ठिकाणी रबीची पेरणी करण्यात येईल.
रोजगारनिर्मितीची प्रयत्न
विशेषतः आहे त्या परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त काम काढून आणि त्या कामांच्या माध्यमातून रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल हा देखील सरकारचा प्रयत्न असेल. त्याकरता जलसंधारणाच्या कामावर आमचा भर असेल. दुष्काळामुळे जलसाठे आटले आहेत, त्याचा एक फायदा घेऊन त्याठिकाणी गाळ काढण्याचे काम करण्यात येईल. जेणेकरून थोडाही पाऊस आला तरी देखील पाण्याचा साठा वाढवता येईल. त्यादृष्टीने मोठ्या प्रमाणात जलसाठा करण्यासाठी जुन्या स्ट्रक्चरची दुरुस्ती करण्यावर भर असेल. जेणेकरून पुढच्या काळामध्ये त्याची शेतकऱ्यांना फायदा होईल. (Maharashtra Drought Trigger One)
केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्याकडून तातडीची मदत
दुष्काळी परिस्थितीत केंद्र सरकारकडून मदत मिळण्यासाठी पंचनामे, नुकसानीचा अहवाल आणि ठरावीक नमुन्यात प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. मात्र केंद्राच्या मदतीची प्रतीक्षा न करता राज्य सरकार स्वतःच्या निधीतून शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. केंद्राकडील प्रक्रिया समांतरपणे पूर्ण करून त्यानंतर केंद्राकडूनही भरघोस मदत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Maharashtra Drought Trigger One)
कर्जमाफी झाली, आता पात्र शेतकऱ्यांना कर्ज द्यावेच लागणार
कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना बँकांकडून नव्या कर्जासाठी टाळाटाळ होत असल्याच्या तक्रारींचीही मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. अमरावती डीसीसी बँकेने केवळ ५० टक्के कर्ज देण्याचा निर्णय घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने बँकेला पत्र देऊन पात्र शेतकऱ्यांना कर्ज देणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतर शेतीच्या पुढील हंगामासाठी आवश्यक पीककर्ज मिळण्यात अडथळा येऊ नये, यासाठी प्रशासनाने बँकांना स्पष्ट भूमिका बजावण्यास सांगितले आहे.
सोयाबीन खरेदीची नोंदणी लवकर सुरू
यंदा सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता असली तरी शासकीय दराने सोयाबीनची खरेदी केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. “शासकीय दरानेच खरेदी करू. यावेळी सोयाबीन कमी असल्याने बाजारात मागणी अधिक राहून चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. मात्र, शासनाला खरेदी करावी लागली तर सर्व सोयाबीन खरेदी करू,” असे त्यांनी सांगितले. (Maharashtra Drought Trigger One)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.