मुंबई (Ahilyanagar Ganesh Visarjan Lathi Charge) : अहिल्यानगरच्या भिंगार उपनगरात बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी रात्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठा राडा झाल्याचे निदर्शनास आले. याप्रसंगी पोलिसांना केलेला लाठीचार्ज आणि त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे दीपक वागस्कर या तरुणाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. याच घटनेत आणखी ५ ते ६ जण जखमी झाल्यचीही माहिती आहे. सदर घटनेनंतर भिंगारसह संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून, संतप्त नागरिकांनी आणि गणेशभक्तांनी साईदीप रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेच्या निषेधार्थ २४ सप्टेंबर रोजी भिंगार शहर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, भिंगार येथील समर्थ युवा मंडळ आणि शुकलेश्वर गणेश मंडळ यांची मिरवणूक सोबतच निघाली होती. दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये डीजे वाजवण्यावरून क्षुल्लक वाद झाला. मुळात डीजे बंदी असताना कार्यकर्त्यांमध्ये वाद होणे आणि त्याचे प्रमाणे मोठ्या स्तरावर जाऊ नये यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला असे सांगण्यात येत आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याकरीता पोलिसांनी मंडळाच्या सदस्यांवर सौम्य लाठीचार्ज केला, अशी माहिती आहे. यात शुक्लेश्वर गणेश मंडळाचे सदस्य दीपक वागस्कर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी साईदीप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. (Ahilyanagar Ganesh Visarjan Lathi Charge)
सध्या भिंगार आणि रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. जोपर्यंत दीपक वागस्कर यांच्या मारेकरींवर कारवाई होत नाही, तोवर गणेश विसर्जन होणार नाही अशी भूमिका मंडळ्याच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याचे पाहायला मिळते आहे.
लाठीचार्ज दरम्यान दीपक वाघस्कर घटनास्थळी नव्हते...
अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या म्हणण्यानुसार, मिरवणुकीत एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर मोठ्या संख्येने गणेशभक्त नाचत होते. पोलिसांच्या मते ती ट्रॉली धोकादायक स्थितीत होती आणि ती उलटल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता होती. पोलिसांनी ट्रॉलीवरील लोकांना खाली उतरण्यास सांगितले. मात्र डीजेचा आवाज मोठा असल्याने पोलिसांचे आवाहन ऐकू येत नव्हते, असा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करत लोकांना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, लाठीचार्ज झाला त्या वेळी दीपक वागस्कर घटनास्थळी नव्हते, त्यामुळे त्यांचा मृत्यू लाठीचार्जमुळे झाल्याचा दावा पोलिसांनी फेटाळला आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. दुसरीकडे, मंडळाचे कार्यकर्ते आणि स्थानिकांचा दावा आहे की लाठीचार्जनंतर झालेल्या गोंधळात वागस्कर यांची प्रकृती बिघडली, ते जखमी झाले आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. (Ahilyanagar Ganesh Visarjan Lathi Charge)
भिंगार उपनगरात सर्व मिरवणुका उत्साहात पुढे जात होत्या. सगळा कार्यक्रम परवानग्या घेऊनच चालला होता. बुधवारी सायंकाळी पोलिसांनी धुसफुस घालण्यास सुरुवात केली, याबाबतचे अनेक व्हिडिओ समाजमाध्यमांवरून प्रसारित झाले आहेत. अनेक कार्यकर्त्यांकडून कळले की, त्यांचे भगवे ध्वज, गुलालच्या गोण्या हिसकावून घेतल्या. यावेळी झालेल्या झटापटीत दीपक वागस्कर यांचा मृत्यू झाला. भिंगार पोलीस स्थानकातील संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल होऊन योग्य कारवाई व्हायलाच हवी. जोवर कारवाई होणार नाही, तोवर गणेश विसर्जन होणार नाही अशी भूमिका अहिल्यानगरमधील गणेश मंडळांनी घेतली आहे. - संग्राम जगताप, आमदार (Ahilyanagar Ganesh Visarjan Lathi Charge)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक