मुंबई-एमएमआरमध्ये पुढील १५ ते २० वर्षांत ३० लाख घरे बांधण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा...

सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन;६ हजार कुटुंबांना हक्काची घरे; रोजगारासह २३ नागरी सुविधांची उभारणी

    23-Sep-2026
 
Mumbai MMR Housing Plan         
 
ठाणे(Mumbai MMR Housing Plan): मुंबई आणि एमएमआरमध्ये पुढील १५ ते २० वर्षांत तब्बल ३० लाख घरे बांधण्याचे नियोजन असून, मुंबईसह ठाणे, मीरा-भाईंदर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आदी शहरांमध्ये क्लस्टर विकासाला चालना देण्याचे शासनाचे धोरण आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिली. ठाणे महापालिकेच्या सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टर योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.(Mumbai MMR Housing Plan)
 
सुमारे २० हेक्टर म्हणजेच ५० एकर परिसरात विकसित होणाऱ्या या क्लस्टरमुळे सुमारे ६ हजार कुटुंबांना सुरक्षित आणि दर्जेदार घरे मिळणार आहेत. मात्र, क्लस्टर म्हणजे केवळ निवासी इमारती नव्हेत, तर नियोजित टाऊनशिपच्या माध्यमातून रस्ते, पाणी, सांडपाणी व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, उद्याने, मैदाने, कम्युनिटी हॉल, जिम्नॅशियम, योगा सेंटर, इनडोअर गेम्स, डिजिटल लायब्ररी, डे-केअर सेंटर, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, महिला सक्षमीकरण केंद्र आणि स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग अशा २३ नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. (Mumbai MMR Housing Plan)
 
‘सिटी विथिन द सिटी’ संकल्पनेतून या परिसराचा विकास करण्यात येणार असून, निवासी बांधकामासोबत कमर्शियल विकास आणि स्थानिक रोजगारनिर्मितीवरही भर दिला जाणार आहे. ‘घरातून उतरायचे आणि जवळच कामाला जायचे’ या ‘वॉक टू वर्क’ संकल्पनेतून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली.(Mumbai MMR Housing Plan)
 
ठाण्यातील धोकादायक इमारतींच्या दुर्घटनांचा संदर्भ देत शिंदे यांनी क्लस्टरचा प्रवास सुमारे २० वर्षांच्या संघर्षानंतर प्रत्यक्षात आल्याचे सांगितले. किननगरमधील साईराज इमारत दुर्घटनेसह विविध दुर्घटनांनंतर धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर उपोषणे, मोर्चे आणि विधानसभेत सातत्याने आवाज उठवला. नगरविकास मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून धोरणात्मक अडथळे दूर करून क्लस्टरला गती दिल्याचे त्यांनी नमूद केले. किसननगरमधील पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे असून, लवकरच रहिवाशांना घरांच्या चाव्या देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. (Mumbai MMR Housing Plan)
 
रहिवाशांच्या मागण्यांबाबत कॉर्पस फंड, अतिरिक्त १०० चौरस फूट जागा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे आणि छोट्या दुकानदारांच्या पुनर्वसनाचा विचार करण्याचे संकेत शिंदे यांनी दिले. “दोन पैसे कमी नफा झाला तरी चालेल; नागरिकांच्या घरांच्या दर्जात कपात करू नका,” अशी सूचना त्यांनी विकासकांना केली. (Mumbai MMR Housing Plan)
 
सिद्धेश्वर तलावाच्या पुनर्विकासासोबतच स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे सांगत तलावाला मोकळा श्वास मिळेल, असेही शिंदे म्हणाले. मेट्रो, अंतर्गत मेट्रो, कोस्टल रोड आणि ठाणे-बोरिवली बोगदा यांसारख्या प्रकल्पांमुळे ठाण्याच्या पायाभूत सुविधांना नवी दिशा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. क्लस्टरमधील इमारती दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण असाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करताना आयकॉनिक इमारतींसाठी प्रोत्साहनात्मक एफएसआयची तरतूद असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Mumbai MMR Housing Plan)
 
“क्लस्टर म्हणजे केवळ घर नव्हे; चांगले घर, चांगल्या सुविधा, रोजगार आणि बदललेले जीवनमान,” असा संदेश देत शिंदे यांनी हरिवंश राय बच्चन यांच्या ‘कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती’ या ओळींचा दाखला दिला. विकासकांनी नागरिकांना वेळेत घरे देतानाच चांगल्या सुविधांसोबत मोठा टीव्हीही भेट म्हणून द्यावा, अशी मिश्कील सूचनाही त्यांनी केली. (Mumbai MMR Housing Plan)
 
या कार्यक्रमाला माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, आमदार रविंद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, डॉ. माधव कुसेकर, प्रशांत रोडे, सभागृह नेते हनुमान जगदाळे, विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण, शहरप्रमुख हेमंत पवार, नगरसेवक नारायण पवार, राम रेपाळे, राजेश मोरे, पवन कदम, संजय वाघुले यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (Mumbai MMR Housing Plan)
 
 
 




संबंधित मजकूर