मुंबई (MPSC Student Protest): गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता राजकीय वळण मिळाले असून, त्याचा फटका विद्यार्थ्यांच्या भवितव्याला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दिशाभूल करणाऱ्या राजकीय नेत्यांपासून दूर राहून आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन भाजपा आमदार विक्रम पाचपुते यांनी बुधवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (MPSC Student Protest)
आंदोलक विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्यांवर सरकार सकारात्मक असून, त्यावर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या माध्यमातून आगामी काळात विक्रमी भरती करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, आता काही असंवैधानिक मागण्या पुढे करून आंदोलनाला वेगळे वळण दिले जात असल्याचा दावा पाचपुते यांनी केला. (MPSC Student Protest)
“एमपीएससी अध्यक्षांना हटवण्याची मागणी केली जात आहे. मात्र, घटनेतील कलम ३१७ नुसार आयोगाच्या अध्यक्षांना हटविण्याचे अधिकार राष्ट्रपतींकडे आहेत. त्यामुळे अशी मागणी करणेच घटनात्मकदृष्ट्या योग्य नाही. सुरुवातीच्या १२ मागण्यांपैकी ११ मागण्यांवर मुख्यमंत्री चर्चा करण्यास तयार आहेत. मात्र, बारावी मागणी असंवैधानिक असल्याने ती पूर्ण होऊ शकत नाही,” असे पाचपुते म्हणाले. (MPSC Student Protest)
एमपीएससीच्या आंदोलनात विद्यार्थ्यांच्या भावनेचा राजकीय फायद्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोपही पाचपुते यांनी केला. राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा उल्लेख करत ते म्हणाले की, आंदोलनातील अनेक विद्यार्थी दुष्काळी भागातून आले आहेत. त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न होऊ नये. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळणे आणि त्यांचे भवितव्य सुरक्षित राहणे महत्त्वाचे आहे. (MPSC Student Protest)
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या समितीचे काम सुरू असल्याची माहिती पाचपुते यांनी दिली. व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली ४ सप्टेंबर रोजी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा दौरा सुरू असून, समितीच्या सदस्यांकडून विविध ठिकाणी विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा केली जात आहे. आतापर्यंत सुमारे ११०० विद्यार्थी अथवा त्यांच्या शिष्टमंडळांचे म्हणणे थेट ऐकून घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. (MPSC Student Protest)
“समिती विद्यार्थ्यांशी आठ-आठ तास चर्चा करत आहे. त्यामुळे आंदोलकांच्या काही शंका किंवा आक्षेप असतील तर त्यांनी ते समितीसमोर मांडावेत,” असे पाचपुते यांनी सांगितले.
आंदोलनात राजकीय पक्षांचा सहभाग वाढत असल्याचा आरोप करत पाचपुते यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. कालच्या आंदोलनात काँग्रेसच्या युवक अध्यक्षांची उपस्थिती होती. तसेच राहुल गांधीही आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय सीजेपीकडूनही आंदोलन सुरू असल्याचे सांगत, संपूर्ण आंदोलनाला सरकारविरोधी राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. (MPSC Student Protest)
मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून निर्णय घेण्याची असल्याचेही पाचपुते यांनी नमूद केले. “सरकारची बदनामी झाली तरी चालेल, मात्र विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ देणार नाही,” अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी बैठकीत स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आंदोलनाऐवजी चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचे पाचपुते म्हणाले.
पुण्यात आंदोलनासाठी पोलिस आयुक्तांची भेट घेण्यात आल्याचा उल्लेख करत पाचपुते यांनी २६ सप्टेंबरच्या आंदोलनाच्या मागणीवरही प्रश्न उपस्थित केला. पुण्यात गणेश विसर्जनाच्या काळात ४८ तास मोठा पोलीस बंदोबस्त असतो. त्यामुळे या काळात आंदोलनाला परवानगी मिळणे कठीण असल्याची माहिती आंदोलकांना असतानाही २६ सप्टेंबरची तारीख जाणीवपूर्वक मागण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “सरकार आंदोलन करू देत नाही, असे चित्र निर्माण करण्याचा रोहित पवार यांचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला राजकीय नाट्याचे स्वरूप देण्याऐवजी त्यांनी हा प्रकार थांबवावा,” असे पाचपुते यांनी म्हटले. (MPSC Student Protest)