मुंबई (Mayank Lohar Murder Case) : मुंबई लोकलमध्ये २२ वर्षीय मयंक लोहार याची चाकूने वार करून हत्या केल्याच्या आरोपातील रोशन सुवर्णा याच्याविरोधात सत्र न्यायालयाकडून पुढील सुनावणीदरम्यान आरोप निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खटला जलदगतीने चालविण्याच्या दृष्टीने ही कार्यवाही केली जाणार आहे. आरोप निश्चितीसाठी होणाऱ्या पुढील सुनावणीला, म्हणजेच ३ ऑक्टोबर रोजी, रोशन सुवर्णा यास न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर करण्याचे निर्देश ठाणे कारागृहाच्या अधीक्षकांना देण्यात आले आहेत. खटला जलदगतीने चालविण्याचे निर्देश देणारा उच्च न्यायालयाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर सत्र न्यायालयाने ही कार्यवाही केली. (Mayank Lohar Murder Case)
सत्र न्यायालयाला उच्च न्यायालयाकडून २४ ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशाचे पत्र प्राप्त झाले. या आदेशानुसार सदर खटला जलदगतीने चालविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, सुनावणीदरम्यान सरकारी वकील सुधीर सपकाळे यांनीही खटल्याची सुनावणी सुरू करण्याची मागणी करत आरोपीला न्यायालयात प्रत्यक्ष हजर करण्याची विनंती केली. त्यानुसार न्यायालयाने रोशन सुवर्णा विरोधात प्रोडक्शन वॉरंट जारी केले आहे. (Mayank Lohar Murder Case)
दि. २३ जून रोजी चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलमध्ये अंधेरी आणि बोरीवली स्थानकांदरम्यान प्रथम श्रेणीच्या डब्यात २२ वर्षीय मयंक लोहार याच्यावर रोशन सुवर्णा याने पोटावर आणि छातीवर तीन ते चार वेळा चाकूने वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या लोहारचा वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या १५ तासांत आरोपीचा माग काढून, दुसऱ्याच दिवशी त्याला अटक केली होती. (Mayank Lohar Murder Case)
बोरीवली रेल्वे पोलिसांनी ऑगस्टमध्ये सुवर्णाविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात प्रत्यक्षदर्शींसह एकूण ६८ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. याशिवाय अभियोजन पक्षाने तांत्रिक पुराव्यांचाही आधार घेतला आहे. त्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य व्हिडीओ फुटेजचा समावेश असून, या चित्रफितींमध्ये रोशन सुवर्णा हल्ला करताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. (Mayank Lohar Murder Case)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक