दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले मुख्यमंत्री! हवालदिल शेतकऱ्यांना अश्रू अनावर ; मुख्यमंत्र्यांनी छातीशी कवटाळले !

१९७२ नंतर पहिल्यांदाच लातूर जिल्ह्याला दुष्काळाची झळ! वाळलेल्या सोयाबीनची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी; शेतकऱ्यांना सरसकट मदतीचे देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

  
 Latur Drought 2026
 
मुंबई (Latur Drought 2026): पावसाने दडी मारल्याने हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक करपून गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक डोळ्यांदेखत वाळल्याने शेतकऱ्यांचा बांध बुधवारी फुटला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील जाऊ आणि औसा तालुक्यातील खरोसा येथे थेट शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. वाळलेल्या सोयाबीनच्या धाटी मुख्यमंत्र्यांच्या हाती देताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाणार असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. (Latur Drought 2026)
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवार, दि.२३ सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांचा दौरा केला. लातूर जिल्ह्यातील जाऊ (ता. निलंगा), खरोसा (ता. औसा), धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा, मलकापूर (ता. कळंब) तसेच सोलापूर जिल्ह्यातील धानोरे (ता. बार्शी) आणि कारंबा (ता. उत्तर सोलापूर) येथे त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी दौऱ्यात सहभागी होते. (Latur Drought 2026)
 
 
 
जाऊ शिवारातील पाहणीदरम्यान पावसाअभावी वाळलेल्या सोयाबीनची स्थिती मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांचे नुकसान, जनावरांसाठी उपलब्ध असलेला चारा, पिण्याच्या पाण्याची स्थिती आणि दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अडचणींची माहिती घेतली. परिस्थितीचा सातत्याने आढावा घेऊन आवश्यक ती मदत केली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. (Latur Drought 2026)
 
राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असून लातूर जिल्ह्याला त्याचा मोठा फटका बसला आहे. दुष्काळाची पहिली अधिसूचना लवकरच काढण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
 
 
 
शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत थेट खात्यात देण्यासाठी शासनाकडून केली जात असून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थितीत पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून, गरजेनुसार उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. (Latur Drought 2026)
 
शेतकऱ्यांना देवाभाऊंची आधाराची मिठी !
 
‘आमच्यावर आभाळ फाटलंय साहेब... साल कसं काढायचं, गुरं-ढोरं कशी जगवायची? तुम्हीच आमचा आधार आहात, आम्हाला आधार द्या,’ अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. अश्रू अनावर झालेल्या शेतकऱ्यांना छातीशी कवटाळून मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. (Latur Drought 2026)
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर