मुंबई : खासगी आराम बससेवांकडे वळणाऱ्या प्रवाशांना पुन्हा एसटीकडे आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) लांब पल्ल्याच्या प्रवासात आधुनिक सेवा देण्याची तयारी सुरू केली आहे. एसटीच्या ताफ्यात लवकरच २०० स्वमालकीच्या अत्याधुनिक वातानुकूलित व्होल्वो बसेस दाखल होणार आहेत. यामध्ये १७० आसनी आणि ३० शयनयान बसेसचा समावेश असून, सुरक्षितता, आरामदायी प्रवास आणि डिजिटल सुविधांवर भर देण्यात येणार आहे. “पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होत आहेत,” अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. (MSRTC 200 Volvo Buses)
२५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या आणि पाच ते सहा तासांच्या प्रवासासाठी आरामदायी ४५ आसनी बसेस, तर रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ३० किंवा ४५ शयनयान क्षमतेच्या बसेस उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे दिवसा आणि रात्रीच्या प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार आरामदायी प्रवासाचा पर्याय मिळणार आहे. (MSRTC 200 Volvo Buses)
मोबाईलवरूनच आरक्षण
नव्या सेवेत डिजिटल बुकिंगला विशेष महत्त्व देण्यात येणार आहे. एसटीच्या अधिकृत ऑनलाईन आरक्षण व्यवस्थेबरोबरच खासगी डिजिटल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवरूनही तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महामंडळाचा मानस आहे. त्यामुळे प्रवाशांना घरबसल्या बसची वेळ, मार्ग आणि उपलब्ध आसनांची माहिती घेऊन आरक्षण करता येणार आहे. (MSRTC 200 Volvo Buses)
आतिथ्यसेवेसाठी खासगी संस्थेची मदत
प्रवाशांना केवळ आरामदायी बसच नव्हे, तर दर्जेदार सेवा देण्यासाठी आतिथ्य व्यवस्थापनात खासगी संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. स्वागत, स्वच्छता, प्रवाशांना आवश्यक माहिती आणि अन्य मूलभूत सुविधांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध केले जाणार आहे. (MSRTC 200 Volvo Buses)
दरम्यान, महाराष्ट्रातील तसेच आंतरराज्य मार्गांवर खासगी आराम बससेवेला असलेली मागणी, प्रवासी संख्या, अंतर, प्रवासाचा कालावधी आणि आर्थिक व्यवहार्यता यांचा अभ्यास करून व्होल्वो आणि शयनयान बसेसचे मार्ग निश्चित केले जाणार आहेत. एसटीच्या विस्तृत जाळ्याला आधुनिक सुविधा, डिजिटल आरक्षण आणि दर्जेदार आतिथ्यसेवेची जोड देत ‘लालपरी’ला लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासाच्या क्षेत्रात नवे रूप देण्याचा प्रयत्न असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. (MSRTC 200 Volvo Buses)