मुंबई,(ST NCMC Card Issue) : सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एसटी महामंडळाच्या डिजिटल व्यवस्थेतील त्रुटी समोर येऊ लागल्या आहेत. कार्ड असूनही रिचार्ज होत नसल्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांवर चक्क एसटीमधून उतरण्याची वेळ आल्याचा धक्कादायक प्रकार कुडाळ येथे समोर आला आहे. कुडाळ-मालवण मार्गावरील या प्रकारामुळे सवलतधारक प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.(ST NCMC Card Issue)
सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओनुसार, सुमारे ७५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांसह महिला प्रवाशांकडे एनसीएमसी कार्ड होते. मात्र कार्डमध्ये रिचार्ज होत नसल्याचे सांगत त्यांना तिकीट देण्यात आले नाही. अखेर या प्रवाशांना एसटीमधून खाली उतरावे लागले आणि बस पुढे रवाना झाली. कार्ड असूनही प्रवास करता येत नसेल तर कार्डचा उपयोग काय? असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.(ST NCMC Card Issue)
एसटी महामंडळाने सवलतधारकांसाठी एनसीएमसी कार्डची व्यवस्था केली असली, तरी प्रत्यक्षात कार्ड रिचार्ज करण्याच्या सुविधेबाबत अडचणी निर्माण होत आहेत. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, डेपोत रिचार्ज होत नाही. वाहकाच्या मशीनमधून रिचार्ज करण्याचा प्रयत्न केल्यास तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे पैसे असूनही कार्डमध्ये रक्कम भरता येत नाही आणि तिकीटही मिळत नाही, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही समस्या अधिक गंभीर आहे. अनेक सवलतधारकांना अद्याप कार्ड मिळालेले नसतानाच कार्डच्या वापराबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. डिजिटल प्रक्रियेची मर्यादित माहिती असलेल्या ज्येष्ठ प्रवाशांना त्याचा थेट फटका बसत आहे.(ST NCMC Card Issue)
महामंडळाने मान्य केली तांत्रिक अडचण
एसटी महामंडळाने २ सप्टेंबरला जारी केलेल्या पत्रात एनसीएमसी कार्ड प्रणालीच्या सर्व्हरवरील वाढलेल्या भारामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना सवलतीचे तिकीट देताना अडचणी येत असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे १४ सप्टेंबरपर्यंत सवलतधारकांना मॅन्युअल तिकिटावर सवलतीच्या दरात प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी करूनही कार्ड न मिळालेल्या प्रवाशांना नोंदणीची पावती दाखवून ३० सप्टेंबरपर्यंत सवलतीचा प्रवास करता येणार आहे. ऑनलाइन आरक्षण केलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनाही आरक्षित तिकिटावर सवलतीचा प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.(ST NCMC Card Issue)
प्रवाशांना अनिवार्यता; वाहकांना प्रशिक्षणच नाही!
एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले असले, तरी वाहकांना कार्डच्या वापराबाबत पुरेसे प्रशिक्षण आणि स्पष्ट मार्गदर्शन मिळाले आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. यापूर्वी ऑनलाइन तिकीट प्रणालीच्या वेळीही अपुऱ्या प्रशिक्षणामुळे प्रवाशांना अडचणी आल्या होत्या. आता एनसीएमसी कार्डच्या तांत्रिक अडचणी, मशीनमधील बिघाड आणि हाताळणीबाबतचा संभ्रम यामुळे वाहकांनाही संतप्त प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.(ST NCMC Card Issue)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.