मुंबई(IIT Bombay Student Death): देशातील अत्यंत प्रतिष्ठित आणि सर्वोच्च शिक्षण संस्था असलेल्या मुंबईतील ’इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ मधून हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाच्या द्वितीय वर्षात शिकणार्या एका २२ वर्षीय विद्यार्थ्याने वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. परीक्षेदरम्यान मोबाईलच्या सहाय्याने ’चॅट जीपीटी’ चा वापर करून उत्तरे शोधल्याचा प्रकार समोर आल्यानंतर काही तासांतच घडलेल्या या घटनेने संपूर्ण शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (IIT Bombay Student Death)
शुक्रवारच्या दिवशी महाविद्यालयात परीक्षा सुरू असताना, संबंधित विद्यार्थी मोबाईल फोनचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले. तपासादरम्यान त्याने परीक्षेची प्रश्नपत्रिका ’चॅट जीपीटी’वर अपलोड करून त्याद्वारे उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. या प्रकारानंतर परीक्षा हॉलमधील संबंधित निरीक्षक आणि विभागप्रमुखांनी त्या विद्यार्थ्याला बोलाऊन त्याची कानउघाडणी केली होती. मात्र आयआयटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या प्रकारानंतर त्या विद्यार्थ्यावर कोणतीही कठोर किंवा शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नव्हती. एवढेच नव्हे तर, विभागप्रमुख आणि प्राध्यापकांनी त्याचे समुपदेशन करून, या छपाई किंवा कॉपी प्रकरणाचा त्याच्या भविष्यातील शैक्षणिक कारकिर्दीवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही, असा पूर्ण दिलासाही दिला होता. हे सर्व घडल्यानंतर तो विद्यार्थी दुपारी आपल्या हॉटेस रूममध्ये परतला. परंतु, संध्याकाळच्या सुमारास त्याने आपल्या खोलीत टोकाचे पाऊल उचलल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संस्थेला तातडीने पावले उचलत सुरू असलेल्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. (IIT Bombay Student Death)
प्रशासन आणि पोलीस तपास
आयआयटी प्रशासनाने या घटनेवर तीव्र शोक व्यक्त करत एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. प्रशासनाने मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबियांना, वर्गमित्रांना आणि प्राध्यापकांना धीर देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पॉवई पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूमागची नेमकी कारणे शोधण्यासाठी पोलीस सर्व बाजूने कसून तपास करत आहेत. (IIT Bombay Student Death)
एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.