दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्याच्या तिजोरीतून मदत, केंद्राच्या मदतीची वाट पाहणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    19-Sep-2026
Fadnavis Drought Relief for Farmers
 
नागपूर(Fadnavis Drought Relief for Farmers) : राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिके करपण्याच्या मार्गावर असून उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार आपल्या तिजोरीतून शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपूर येथे ते बोलत होते.(Fadnavis Drought Relief for Farmers)
 
फडणवीस म्हणाले, “मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. सर्व मंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यांमध्ये जाऊन परिस्थितीची प्राथमिक पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आठवडाभरात प्राथमिक अहवाल सरकारला मिळणार असून, ५ ऑक्टोबरनंतर एनडीआरएफच्या निकषांनुसार प्रत्यक्ष पंचनामे करण्यात येतील. त्यानंतर केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. मात्र केंद्राकडून मदत मिळेपर्यंत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार नाही”, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. (Fadnavis Drought Relief for Farmers)
 
राज्याच्या उपलब्ध संसाधनांतून तातडीची आर्थिक मदत देण्याचे सरकारचे नियोजन आहे. पिके वाचवण्यासाठी विहिरींमध्ये पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना संध्याकाळच्या वेळी अतिरिक्त वीजपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तांत्रिक कारणांमुळे बंद असलेली सिंगल फेज वीजपुरवठ्याची व्यवस्थाही सुरू करण्यात येत आहे. चारा टंचाई टाळण्यासाठी यापूर्वीच ‘वैरण विकास कार्यक्रम’ राबवण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मराठवाड्यातील काही लघु धरणांमध्ये पाण्याची कमतरता असल्याने धरणांमधील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या तीन याद्या जाहीर झाल्या असून उर्वरित पात्र लाभार्थ्यांच्या याद्या युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Fadnavis Drought Relief for Farmers)
 
दुष्काळ तातडीने जाहीर करण्याच्या विरोधकांच्या मागणीवर फडणवीस यांनी एनडीआरएफच्या नियमांचे पालन आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. “शेतकरी संकटात असताना सर्वांनी एकत्र येऊन मदत करावी; मात्र विरोधकांना प्रत्येक संकटात राजकारण करण्याची सवय लागली आहे,”असा टोला त्यांनी लगावला.(Fadnavis Drought Relief for Farmers)
 
 




संबंधित मजकूर