दौंडच्या मातीत बालपणापासून रुजलेली वन्यजीवांविषयीची आस्था, क्षेत्रीय अनुभवाला वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड आणि समाजात संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी धडपडणार्या नचिकेत सुधीर अवधानींविषयी...
दौंडच्या मातीतून वन्यजीव संवर्धनाची चळवळ उभी करणारे एक समर्पित नाव म्हणजे नचिकेत अवधानी. वन्यजीवांबद्दलची आस्था, प्रत्यक्ष क्षेत्रातील अनुभव, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समाजामध्ये जनजागृती करण्याची तळमळ या चारही गोष्टींचा सुंदर संगम त्यांच्या कार्यातून दिसून येतो. वन्यजीव संवर्धनाची त्यांची वाटचाल ही केवळ एखाद्या संस्थेच्या स्थापनेपासून सुरू झालेली नाही, तर त्यामागे अनेक दशकांची कौटुंबिक प्रेरणा आहे. त्यांचे वडील सुधीर अवधानी हे १९७२ पासून दौंड परिसरात वन्यजीव बचाव आणि संवर्धनाच्या कार्यात सक्रिय होते. बालपणापासूनच वडिलांच्या या कार्याचा प्रभाव नचिकेत यांच्या मनावर पडला आणि वन्यजीवांना वाचवणे, त्यांचे पुनर्वसन करणे आणि योग्य वेळी त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडणे, या कार्याशी त्यांचे नाते घट्ट होत गेले.
२०१८ मध्ये नचिकेत अवधानी यांनी ’ "Environmental Conservation Trust", Daund’ या संस्थेची स्थापना केली. वन्यजीव बचावाचे काम अधिक व्यापक, शिस्तबद्ध आणि व्यावसायिक पद्धतीने पुढे नेणे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू. या कार्यात त्यांनी ‘रेस्यू चॅरिटेबल ट्रस्ट’, वनविभाग आणि इतर संबंधित घटकांशी समन्वय साधत, ‘वन्यजीव बचाव, संवर्धन’, जनजागृती आणि मानव-वन्यजीव सहअस्तित्व यांवर भर दिला. नचिकेत यांना मागील आठ वर्षांत विविध प्रजातींच्या तीन हजारांहून अधिक वन्यजीव बचाव मोहिमांमध्ये सहभागही घेतला.
२०२४ मध्ये इंदापूर परिसरातील एका विहिरीत अडकलेल्या प्राण्याच्या बचाव मोहिमेत नचिकेत अवधानी आणि त्यांच्या सहकार्यांच्या पथकाने सहभाग घेतला. सुरुवातीला ‘सिव्हेट’ असल्याचे समजलेल्या या प्राण्याची ओळख नंतर ‘युरेशियन पाणमांजर’ म्हणून पटली. पुणे जिल्ह्यात या प्रजातीची यापूर्वी कधीही नोंद झाली नव्हती. वन्यजीव संवर्धन केवळ जंगलात किंवा बचाव मोहिमांपुरते मर्यादित राहू नये, तर समाजाच्या मानसिकतेत बदल घडला पाहिजे, असा त्यांच्या कार्याचा दृष्टिकोन आहे. त्यांनी ३००हून अधिक जनजागृती कार्यक्रम घेतले असून गावांमध्ये, शाळा-महाविद्यालयांमध्ये, तसेच कॉर्पोरेट संस्थांमध्ये मिळून २० हजारांहून अधिक नागरिकांपर्यंत वन्यजीव संवर्धन, मानव-वन्यजीव सहअस्तित्व, संघर्ष प्रतिबंध आणि निसर्गसंवर्धनाचा संदेश पोहोचवला आहे. बिबट्यांसोबत सुरक्षित सहजीवन, शहरी वन्यजीव आणि वन्यजीवांशी होणारे संभाव्य संघर्ष टाळण्याबाबत विविध जनजागृती सत्रांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. २०२३ मध्ये दौंड परिसरात ‘रोटरी क्लब’च्या सदस्यांसाठी, तसेच इतर ठिकाणी स्थानिक नागरिकांसाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वन्यजीव बचावाबरोबरच माणसाच्या मनातील वन्यजीवांविषयीची भीती आणि गैरसमज दूर करण्याचा दृष्टिकोन त्यामागे आहे.
क्षेत्रीय अनुभवाला वैज्ञानिक अभ्यासाची जोड देणे, ही नचिकेत यांच्या कार्याची आणखी एक उल्लेखनीय बाजू. ’Tolerance between wolves and golden jackals in India’ या संशोधन लेखात त्यांचे सहलेखक म्हणून नाव आहे. हा लेख ‘इकोलॉजी’ या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकात २०२४ साली प्रकाशित झाला. या संशोधनात भारतातील लांडगा आणि सोनेरी कोल्हा यांच्या असामान्य सहअस्तित्वाचा अभ्यास करण्यात आला असून, महाराष्ट्रातील या निरीक्षणाच्या नोंदीमध्ये नचिकेत यांचा सहभाग होता. यामुळे त्यांचे कार्य केवळ ‘रेस्यू’पुरते मर्यादित न राहता, निरीक्षण, दस्तऐवजीकरण, संशोधन आणि संवर्धन या व्यापक चौकटीत पाहता येते.
नचिकेत भारतीय रेल्वेमध्ये २०१० पासून कार्यरत असूनही, वन्यजीव संवर्धनाची सामाजिक बांधिलकी त्यांनी सातत्याने जोपासली आहे. एका बाजूला नोकरीची जबाबदारी आणि दुसर्या बाजूला वन्यजीव बचाव, जनजागृती, संशोधन आणि पर्यावरण संवर्धनाचे कार्य या दोन्ही जबाबदार्या सांभाळत त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
दौंडसारख्या ग्रामीण आणि कृषिप्रधान परिसरात मानव-वन्यजीव संघर्षाची आव्हाने वेगळी आहेत. अशा परिस्थितीत वन्यजीवांविषयी संवेदनशीलता निर्माण करणे, वैज्ञानिक पद्धतीने बचावकार्य करणे आणि स्थानिक समाजाला संवर्धनाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणे, ही काळाची गरज आहे. नचिकेत यांचे कार्य या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांचे एक उदाहरण ठरते. त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू एका साध्या विचारात सामावतो, वन्यजीवांचे संरक्षण म्हणजे केवळ प्राण्यांचे रक्षण नव्हे; तर त्यांच्या अधिवासाचे, परिसंस्थेचे आणि माणूस-निसर्गाच्या नात्याचे संरक्षण होय.
दौंडच्या मातीत बालपणापासून रुजलेली वन्यजीवांविषयीची आस्था आज हजारो बचाव मोहिमा, शेकडो जनजागृती कार्यक्रम आणि वैज्ञानिक संशोधनाच्या माध्यमातून पुढे जात आहे. त्यामुळे नचिकेत हे केवळ वन्यजीव बचावकर्ते नाहीत, तर माणूस आणि वन्यजीव यांच्यातील सहअस्तित्वाचा संवाद घडवून आणणारे एक संवेदनशील वन्यजीव कार्यकर्ते म्हणून त्यांच्या कार्याकडे पाहता येते. त्यांना पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!