राज्यातील वायू, जलप्रदूषण रोखण्यासाठी समिती स्थापन; उद्योगांची बँक हमी वाढवण्याबाबतही अभ्यास करणार!

    16-Sep-2026   

Maharashtra Pollution Control Committee

मुंबई (Maharashtra Pollution Control Committee) :
राज्यातील वायू व जलप्रदूषण रोखण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांची बँक हमी (डिपॉझिट रक्कम) वाढवण्याबाबत अभ्यास करून निर्णय सुचविण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने समिती गठीत केली आहे. पर्यावरण व वातावरणीय बदलमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. मंगळवारी, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
 
या समितीत विधानसभेचे सदस्य सुधीर मुनगंटीवार, अमल महाडिक आणि प्रशांत ठाकूर यांच्यासह उद्योग व खनिकर्म विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, पर्यावरण विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव यांचा समावेश आहे. याशिवाय वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, महाऔष्णिक वीज केंद्र आणि स्टील उद्योग या तीन उद्योगांचे प्रतिनिधी समितीचे सदस्य असतील. (Maharashtra Pollution Control Committee)

समितीची कार्यकक्षा
 
ही समिती राज्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांची बँक हमी वाढविण्याबाबत तज्ज्ञांच्या समन्वयाने अभ्यास करणार आहे. तसेच वायू व जलप्रदूषण रोखण्यासाठी तांत्रिक उपाययोजना आणि धोरणात्मक निर्णय सुचविण्याची जबाबदारी समितीवर सोपविण्यात आली आहे. राज्यातील विविध औद्योगिक क्षेत्रे आणि प्रदूषण करणाऱ्या ठिकाणांचे अहवाल तयार करण्याचे कामही समिती करणार आहे. (Maharashtra Pollution Control Committee)





अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर