मुंबई (Ashram School Teacher Recruitment) : महाराष्ट्रातील दुर्गम आणि आदिवासी भागातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक निर्णय घेतला आहे. ’पवित्र पोर्टल’द्वारे निवड झालेल्या नवीन शिक्षकांना आश्रमशाळांमध्ये नियुक्ती (पदस्थापना) देताना आता केवळ रिक्त पदांचा विचार न करता, संबंधित शाळेतील प्रत्यक्ष विद्यार्थी पटसंख्या आणि विषयांची गरज लक्षात घेऊनच नियुक्ती दिली जाणार आहे. आदिवासी विकास विभागाने यासंदर्भात सुधारित व पारदर्शक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केल्यामुळे वर्षानुवर्षे सुरू असलेल्या विस्कळीत शिक्षक वाटपाच्या परंपरेला आता पूर्णविराम मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागाने नुकतीच ’पवित्र’ प्रणालीद्वारे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या तब्बल २,४२१ पदांची मेगाभरती प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये पेसा) क्षेत्रातील ८८५ आणि बिगर पेसा क्षेत्रातील १,५३६ पदांमधील पात्र उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांची अंतिम नियुक्ती करत असताना, शासनाने जुने निकष बदलून शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येवर आधारित नवा फॉर्म्युला लागू केला आहे. नवीन नियमांनुसार, ज्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, तिथे प्राधान्याने शिक्षक दिले जातील. यामुळे शाळांमधील शिक्षकांचा असमतोल आता पूर्णपणे दूर होणार आहे. (Ashram School Teacher Recruitment)
विषयांच्या गरजेनुसार शिक्षकांची विभागणी
आश्रमशाळांमध्ये अनेकदा गणित, विज्ञान आणि इंग्रजी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचे शिक्षक उपलब्ध नसतात, तर काही भाषा विषयांचे शिक्षक अतिरिक्त असतात. ही त्रुटी दूर करण्यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत आधी कोणत्या विषयाची किती पदे आवश्यक आहेत, याची काटेकोर निश्चिती केली जाईल. उच्च माध्यमिक स्तरावर मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र यांसारख्या कला शाखांसह गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विज्ञान शाखेच्या विषयांची गरज तपासूनच विषयनिहाय पदस्थापना केली जाईल. प्राथमिक व माध्यमिक स्तरावर इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार भाषा, गणित आणि सामाजिक शास्त्रांच्या शिक्षकांची विभागणी समान पद्धतीने केली जाणार आहे. (Ashram School Teacher Recruitment)
वशिलेबाजीला लगाम आणि पारदर्शकता
यापूर्वी शिक्षकांच्या बदल्या किंवा नियुक्त्यांमध्ये अनेकदा राजकीय दबाव किंवा वशिलेबाजी होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. अनेक शिक्षक सुगम भागातील शाळांमध्ये राहण्यासाठी धडपडत असत, ज्यामुळे दुर्गम शाळा ओस पडत होत्या. मात्र, आता थेट विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि ’कम्प्युटराईज्ड’ विषय गरजेचा डेटा समोर ठेवूनच ’पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून या नियुक्त्या ऑनलाइन पद्धतीने केल्या जात आहेत. यामुळे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आली असून चुकीच्या पद्धतींनी बदल्या किंवा नियुक्त्या करून घेणार्या प्रवृत्तींना मोठा लगाम बसला आहे. (Ashram School Teacher Recruitment)
एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.