‘सिलेक्टिव्ह ऐकायचं, सिलेक्टिव्ह बोलायचं हे चुकीचं’;मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज ठाकरेंना टोला!

अमित शाहांच्या वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादावर मुख्यमंत्र्यांची भूमिका; ‘महाराष्ट्र मराठीचा आहे आणि मराठीच राहणार’

Devendra Fadnavis Raj Thackeray
 
मुंबई (Devendra Fadnavis Raj Thackeray) : महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे बहुभाषिक राज्य असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली आहे. राज ठाकरे यांनी अमित शाह यांच्या वक्तव्यावर ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही,’ असे ट्विट केले. या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत अमित शाह यांचे संपूर्ण भाषण ऐकले असते, तर कदाचित अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या नसत्या, असे म्हटले आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पहिल्यांदा तर श्री. अमित भाई शाह यांचं पूर्ण भाषण ऐकलं असतं, तर कदाचित अशा प्रकारच्या प्रतिक्रियाच आल्या नसत्या. पण सिलेक्टिव्ह दाखवायचं, सिलेक्टिव्ह ऐकायचं आणि सिलेक्टिव्ह गोष्टींवरच प्रतिक्रिया घ्यायच्या, हे अतिशय चुकीचं आहे.” (Devendra Fadnavis Raj Thackeray)
 
अमित शाह यांच्या भाषणातील मराठीच्या गौरवाचा भाग ऐकला असता, तर टीका करण्यासाठी काहीच उरले नसते, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. ते म्हणाले, “कारण त्याच्यावर बोललं, तर तुमचे थोबाडं काळी होतात. कारण मग तुम्हाला टीका करायला काही राहत नाही. मग तुम्हाला त्यांच्याबद्दल बोलता येत नाही. हे जाणीवपूर्वक या ठिकाणी करणं चाललेलं आहे, हे सगळ्यांना माहिती आहे.” (Devendra Fadnavis Raj Thackeray)
 
अमित शाह यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचे महत्त्व काय आहे, मराठीचा गौरव काय आहे, याबाबत भाष्य केले होते. मराठी भाषेचा सन्मान आणि मातृभाषेतून शिक्षण देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आग्रह याबाबतही त्यांनी भूमिका मांडली होती. मात्र, या वक्तव्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून केवळ बहुभाषिक राज्याच्या उल्लेखावर टीका केली जात असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
 
महाराष्ट्रातील नागरिक अनेक भाषा शिकतात, याचा अर्थ त्यांची मातृभाषा मराठी नाही, असा होत नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “महाराष्ट्र एक असं राज्य आहे की ज्याच्यामध्ये लोकं वेगवेगळ्या भाषा शिकतात. बहुभाषिक असण्याचा अर्थ तुमची मातृभाषा वेगळी असं होत नाही.” (Devendra Fadnavis Raj Thackeray)
 
आपल्या स्वतःच्या उदाहरणातून भाषिक विविधतेचा अर्थ स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले, “मी बहुभाषिक आहे, पण माझी मातृभाषा मराठी आहे. मला मराठीचा अभिमान आहे. पण त्यासोबत मला हिंदी बोलता येते आणि मला इंग्लिश बोलता येतं. त्यामुळे मी बहुभाषिक होतो. याचा अर्थ काय, मी मराठी नाही का? मी मराठीच आहे, मी मराठीच राहणार आहे. माझं मराठीपण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
 
पुढे ते म्हणाले, “मला असं वाटतं, सिलेक्टिव्ह ऐकायचं आणि सिलेक्टिव्ह बोलायचं आणि त्याच्यावर टीका करायची. त्या भाषणामध्ये मराठीच्या गौरवाबद्दल अमित भाई जे बोलले, ते जर त्या ठिकाणी ऐकलं असतं, पण ते ऐकून न ऐकण्यासारखं करायचं आहे. महाराष्ट्र मराठीचा आहे, तो मराठीच राहणार आहे. त्याची मराठी कोणीही या ठिकाणाहून घेऊन जाऊ शकत नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. (Devendra Fadnavis Raj Thackeray)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर