जरांगेंचे आंदोलन म्हणजे अतर्क, आततायीपणा आणि अपमानास्पद शब्दांचेमंत्री आशिष शेलार; जरांगेंनी प्रकृतीची काळजी घ्यावी

    16-Sep-2026   
Ashish Shelar on Manoj Jarange Protest
 
 
मुंबई, (Ashish Shelar on Manoj Jarange Protest) : गणेशोत्सवासारख्या महत्त्वाच्या सणांच्या काळात असे आंदोलन करणे योग्य नाही. मनोज जरांगे यांचे आंदोलन म्हणजे अतर्क, आततायीपणा आणि अपमानास्पद शब्दांचे आहे. ज्या मागण्या मान्य झाल्या आणि ज्या मागण्या न्यायिक प्रकरणात टिकवण्यासाठी व्यवस्था उभी केली आहे, तरीही आंदोलन करणे अतर्क आहे. ज्या विषयात सरकार न्यायालयात भूमिका मांडत असून चर्चा सुरु असतानाही टोकाची भूमिका घेणे आततायीपणाचे आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वापरण्यात येणारी भाषा मान्य नाही. छत्रपती शिवाजी महारांना मानणारा आणि त्यांनी दिलेल्या आदर्शावर चालणारा अशी भाषा वापरू शकत नाही, अशी प्रतिक्रिया सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी दिली.(Ashish Shelar on Manoj Jarange Protest)
 
पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री अॅड. आशिष शेलार म्हणाले की, "गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांतर्फे आंदोलन आणि उपोषण सुरु आहे आणि आता ते मुंबईकडेसुद्धा निघाले आहेत. मनोज जरांगे यांना विनंती आहे की, त्यांनी मुंबईकडे येऊ नये. कुठलाही प्रश्न चर्चेविना सुटत नाही असे नाही. चर्चेनेच प्रश्न सुटतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या महायुती सरकारने मराठा समाजाचे सर्वात जास्त प्रश्न सोडवून त्यांना न्याय दिला आहे. हिंदू सणांच्या काळात राज्यभर आणि विशेषत: पुणे, मुंबईसारख्या शहरात मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होत असतात. आता गणेशोत्सव सुरु असून गौरीही येत आहेत. अशावेळी विघ्नहर्त्याच्या उत्सवात कुठलेही विघ्न येणार नाही याची काळजी आपण सगळे घेत असतो. मनोज जरांगे यांनीसुद्धा ही काळजी घ्यावी. मुंबई, पुणे आणि राज्यभरातील भाविकांना त्रास, अडचण किंवा असुविधा होईल असे कुठलेही कार्य होऊ नये, अशी अपेक्षा आहे."(Ashish Shelar on Manoj Jarange Protest)
 
चर्चेतून प्रश्न सोडविण्याची भूमिका घ्या
 
"मराठा समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करून मार्ग काढता येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नांवर आतापर्यंत अनेक सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यापुर्वीच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने निर्णय घेतले नाही ते आमच्या सरकारने घेतले आहे. त्यामुळे आंदोलनाऐवजी चर्चेच्या माध्यमातून उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी सरकार तयार आहे. मराठा समाजाच्या १४ मागण्यांपैकी १३ मागण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित मागण्यांवरही सरकार सकारात्मकपणे चर्चा करत आहे. मंत्रिमंडळ गटाच्या माध्यमातून याबाबत काम सुरू आहे. त्यामुळे हिंदू सणासुदीच्या काळात आंदोलनाची तीव्रता वाढविण्याऐवजी चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याची भूमिका घ्यावी," असे आवाहन त्यांनी केले.(Ashish Shelar on Manoj Jarange Protest)
 
ते पुढे म्हणाले की, "मराठा समाजासाठी विशेष कायदा, एसईबीसी संदर्भातील निर्णय, ईडब्ल्यूएस अंतर्गत संधी, नोंदणी व प्रमाणपत्र प्रक्रियेबाबतचे निर्णय, शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण, न्यायालयीन प्रक्रिया, निवड होऊनही नियुक्ती न झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीचे संरक्षण, जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया सुलभ करणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता सुलभ करण्याचे निर्णय, आयोगाची स्थापना तसेच न्यायालयात सरकारची भूमिका मांडणे आणि ती टिकविण्यासाठी प्रयत्न करणे, अशी विविध कामे महायुती सरकारने केली आहेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता यांसह विविध बाबींमध्ये ओबीसी समाजाप्रमाणेच सुविधा देण्यासंदर्भात शासन निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ गटाच्या माध्यमातून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या विषयावर काम सुरू असून, उर्वरित अडचणीही दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांची संपूर्ण माहिती आणि अहवाल उपलब्ध आहे. त्यामुळे मराठा समाजाने वस्तुस्थिती लक्षात घ्यावी."(Ashish Shelar on Manoj Jarange Protest)
 
...म्हणून इथे राजकारणाचा वास येतो
 
मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील सरकारविरोधी वक्तव्यांबाबत बोलताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, “आपली भूमिका मांडण्याचा आणि आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वापरली जाणारी अपमानास्पद भाषा मान्य करता येणार नाही. मनोज जरांगे हे माजी मुख्यमंत्री शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजासाठी काहीही केलेले नसताना त्यांच्याबद्दल काहीही बोलत नाही. मात्र, ज्यांनी मराठा समाजासाठी सगळे केले त्यांच्यावर एकेरी भाषेत टीका करतात. त्यामुळे इथे राजकारणाचा वास येतो."(Ashish Shelar on Manoj Jarange Protest)

जरांगेंनी प्रकृतीची काळजी घ्यावी
 
“मनोज जरांगे यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. त्यांच्या तब्येतीची आम्हालाही काळजी आहे. आपल्या मागण्यांसाठी सकारात्मक मार्गाने चर्चा करावी. चर्चेचे दरवाजे सरकारने बंद केलेले नाहीत. मराठा समाजाच्या उर्वरित प्रश्नांवरही चर्चा करून मार्ग काढण्याची सरकारची तयारी आहे. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढविण्याऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारावा आणि गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी,” असे आवाहन मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.(Ashish Shelar on Manoj Jarange Protest)
 
 
 
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर