सांगलीच्या पटवर्धन राजघराण्यात आरतीवरून वाद; अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन आणि वडिलांमध्ये मतभेद चव्हाट्यावर

    15-Sep-2026   



सांगली (Bhagyashree Patwardhan Ganesh aarti) : ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या सांगलीच्या ‘श्री गणपती पंचायतन संस्थान’मध्ये गणेशोत्सवाच्या पावन पर्वातच राजघराण्यातील अंतर्गत कलह सार्वजनिक झाला आहे. संस्थानचे राजे श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी अधिकृतपणे घोषित केलेले दत्तक वारस युवराज आदित्यराजे पटवर्धन यांना डावलून, त्यांची कन्या अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांनी मंदिरात श्रींची आरती केल्याने पटवर्धन राजघराण्यात वादाची ठिणगी पडली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी मंदिराच्या पारंपरिक दरबार हॉलमध्ये गणपती बाप्पाची मुख्य आरती करण्याची वेळ आली, तेव्हा संस्थानच्या जुन्या परंपरेनुसार घोषित उत्तराधिकारी युवराज आदित्यराजे पटवर्धन आरती करणार होते. मात्र, गेल्या चार वर्षांनंतर सांगलीत आलेल्या भाग्यश्री पटवर्धन यांनी आपल्या बहिणींसह थेट गाभार्‍यात प्रवेश केला आणि आदित्यराजेंच्या आधीच श्रींची आरती करण्यास सुरुवात केली.या अचानक घडलेल्या प्रकारामुळे मंदिराचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर आणि भाग्यश्री यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक उडाली. या घटनेमुळे गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मंदिरात आणि राजघराण्याच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली. (Bhagyashree Patwardhan Ganesh aarti)

या संपूर्ण घटनेवर श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की भाग्यश्री यांनी मंदिराच्या शतकानुशतके चालत आलेल्या पवित्र परंपरांचा आणि नियमांचा अनादर करून जबरदस्तीने आरती केली आहे. सांगली संस्थानचे सर्व धार्मिक आणि कायदेशीर उत्तराधिकारी हे केवळ आणि केवळ आदित्यराजे पटवर्धन हेच आहेत. भाग्यश्री पटवर्धन आणि त्यांचे पती हिमालय दासानी यांच्याशी सांगली संस्थान अथवा राजघराण्याच्या कोणत्याही मालमत्तेबाबत कोणीही कसलाही व्यवहार करू नये; असा व्यवहार केल्यास संस्थान जबाबदार राहणार नाही, असा थेट इशारा विजयसिंहराजेंनी दिला आहे. यावर उत्तराधिकारी पदावरून आणि मालमत्तेवरून निर्माण झालेल्या वादावर थेट भाष्य करणे भाग्यश्री यांनी टाळले असले, तरी आपल्या कृतीचे समर्थन करताना त्यांनी कौटुंबिक भावना पुढे केल्या. भाग्यश्री म्हणाल्या, "राजेसाहेबांची (वडिलांची) प्रकृती सध्या ठीक नाही. अशा वेळी सांगलीच्या गणपतीची आणि संस्थानची परंपरा पुढे नेण्यासाठी कुटुंबातील तिन्ही मुलींनी येथे उपस्थित राहणे आम्हाला अत्यंत गरजेचे वाटले. बालपणापासून या गणपतीचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहिलेला आहे आणि तो हक्क कोणापासून हिरावता येत नाही. मात्र सांगलीच्या गणपती मंदिराला मोठा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा आहे. गणेशोत्सवासारख्या मंगलमयी वातावरणात राजघराण्यातील आरतीचा हक्क, परंपरा आणि वारसा हक्काचा वाद अशा प्रकारे चव्हाट्यावर आल्याने सांगलीतील नागरिक आणि भाविकांमधून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Bhagyashree Patwardhan Ganesh aarti)


 




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर