मुंबई (अभिनंदन परुळेकर) : MPSC Staff Protest महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्याशी ११ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या गैरवर्तनाच्या निषेधार्थ आयोगातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. आयोगातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची शासनाकडून ठोस, स्पष्ट आणि प्रभावी हमी मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही संविधानिक संस्था असून सचिव हे आयोगाचे प्रशासकीय प्रमुख आहेत. त्यामुळे प्रशासकीय प्रमुखांशी झालेल्या गैरवर्तनाची घटना ही गंभीर असून, संबंधित व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केली आहे. तसेच आयोगातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना धमकीवजा वक्तव्ये करण्यात आल्याने त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. MPSC Staff Protest
दरम्यान, आयोगाच्या एका परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरप्रकारामुळे उमेदवारांमध्ये संताप, अस्वस्थता आणि अविश्वास निर्माण झाल्याची भावना अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समजून घेतली आहे. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि उमेदवारांच्या भवितव्याशी संबंधित त्यांच्या अपेक्षांचा आदर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. संबंधित प्रकरणातील दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली. MPSC Staff Protest
न्याय्य मागण्यांसाठी आवाज उठविणे, प्रश्न उपस्थित करणे आणि प्रशासनाकडून उत्तरदायित्वाची मागणी करणे हा उमेदवारांचा लोकशाही अधिकार आहे. मात्र, आंदोलनाच्या नावाखाली अधिकारी-कर्मचाऱ्यांना अडविणे, त्यांच्याशी गैरवर्तन करणे, दहशतीचे वातावरण निर्माण करणे किंवा त्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. MPSC Staff Protest
आयोगातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची नावे घेऊन त्यांचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांची आयोगाच्या निवड यादीत नावे असल्याचे सांगत सोशल मीडिया तसेच वृत्तवाहिन्यांवर खोट्या, दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक बातम्या प्रसारित केल्या जात असल्याचा आरोप अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केला आहे.
ज्या पारदर्शक प्रक्रियेची मागणी उमेदवारांकडून केली जाते, त्याच प्रक्रियेतून आयोगातील अधिकारी-कर्मचारी शासन सेवेत दाखल झाले आहेत. आयोगातील अधिकारी-कर्मचारी ग्रामीण, शेतकरी आणि आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंबांतून आलेले असून, स्पर्धा परीक्षेतील संघर्षाची त्यांना पूर्ण जाणीव असल्याचे निवेदनात म्हटले आहे. MPSC Staff Protest