उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांनी निराशेने तोंडावर सुनावले होते - नवनाथ बन

    11-Sep-2026


Navnath Ban Uddhav Thackeray
 
 
मुंबई,(अभिनंदन परुळेकर) : "जनाब संजय राऊत, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली आहे.काही ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती असताना सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून त्यांना मदत करत आहे. उलट, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बांधावर जाऊन दिलेल्या ५० हजार रुपयांच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांनी फुटकी कवडीही मिळाली नसल्याचे तुम्हाला तोंडावर सुनावले. तुम्हाला शेतकऱ्यांशी, मराठवाड्याशी देणेघेणे नाही.१७ सप्टेंबरजवळ आला की मराठवाड्यात जाऊन नौटंकी करायची हा तुमचा जुना धंदा आहे."अशी खरमरीत टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवार दि.११ रोजी केली.(Navnath Ban Uddhav Thackeray)
 
"लालबागमधील कार्यक्रमात महाराष्ट्र गीत सुरू असताना आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे एकमेकांशी गप्पा मारण्यात व्यस्त होते. त्यामुळे तुमचे मराठीप्रेम, महाराष्ट्रप्रेम बेगडी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या महाराष्ट्र गीताचा त्यांनी अपमान केला आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवला होता. परंतु आज आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे महाराष्ट्राच्या स्वाभिमान, सन्मानासाठी उभेही राहू शकत नाहीत. कारण त्यांना मराठीशी, महाराष्ट्राशी काही देणेघेणे राहिलेले नाही. त्यांचे महाराष्ट्र प्रेम हे निव्वळ मते आणि राजकारणासाठी आहे." असे बन म्हणाले.(Navnath Ban Uddhav Thackeray)
 
"ईडीच्या अधिकाऱ्यांची भरती होत असेल तर संजय राऊत आणि रोहित पवार यांच्या पोटात का दुखतेय? रोहित पवार, भरती झाल्यानंतर ईडीचे अधिकारी तुमच्या बारामती अॅग्रोवर कारवाई करतील असे वाटत असल्याने तुम्ही घाबरत आहात का? संजय राऊत यांनी पत्राचाळीत हजारो कोटी रुपये लुटल्याने पुन्हा आर्थर रोड तुरुंगात जावे लागेल म्हणून त्यांना ईडीची भीती असणे साहजिक आहे. चुकीचे करणाऱ्यांवरच ईडी कारवाई करते. त्यामुळे रोहित पवार, तुम्ही काही चुकीचे केले नसेल तर ईडीच्या जाहिरातीला घाबरू नका."असेही बन यांनी सुनावले.(Navnath Ban Uddhav Thackeray)
 
बन पुढे म्हणाले, "महाविकास आघाडीच्या काळात साधू हत्याकांडासाठी नेमलेल्या एसआयटी चौकशीचे काय झाले? पत्रकारांच्या अटकेबद्दल चौकशी करणार होता, त्याचे काय झाले? अंबानींच्या घराबाहेर ठेवलेल्या स्फोटकांच्या चौकशीचे काय झाले? असे शेकडो प्रश्न आम्हालाही विचारता येतील. भाजपा आणि महायुतीच्या सरकारच्या काळात कोणालाही पाठीशी घातले जात नाही. दोषी असलेल्यांवर कारवाई केली जाते. पेपरफुटी प्रकरणामध्ये कारवाई केली. तुमच्यासारखे, ‘सचिन वाझे काय लादेन आहे का?’ म्हणणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. तुम्हाला एसआयटी नाही तर फक्त एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन कळतो. कारण तुमच्याकडे प्रचंड काळा पैसा आला आहे.संजय राऊत, मुंबई महापालिका बरखास्त करून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाची सत्ता येत आपल्याला महापौरपद मिळावे, अशी तुमची कितीही इच्छा असेल. पण मुंबईकरांनी तुम्हाला पूर्णपणे नाकारत महायुतीला निवडून दिल्याने तुम्ही आता स्वप्नातही मुंबई महापालिका बरखास्त करू शकणार नाही. महायुती, भाजपा आणि शिवसेना मुंबईकरांच्या पाठीशी आणि मुंबईकरांसोबत आहेत. महापालिका तुमच्यासारखे घर भरण्यासाठी नाही तर मुंबईकरांची सेवा करण्यासाठी काम करते." अशा शब्दात बन यांनी राऊत यांना फटकारले.(Navnath Ban Uddhav Thackeray)
 
 <iframe width="919" height="517" src="https://www.youtube.com/embed/AQ4u8BHH9u8" title="Mumbai Jay Ambe Talao Controversy | MahaMTB" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share" referrerpolicy="strict-origin-when-cross-origin" allowfullscreen></iframe>
 
 
 
 
 




संबंधित मजकूर