मुंबई : (Konkan Development) कोकणातील सागरी वाहतूक आणि बंदरांशी जोडणाऱ्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत राबविण्यात येणाऱ्या दोन योजनांसाठी एकूण १७० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
या निधीतून जेट्टी, पोहोचरस्ते, संरक्षण भिंती, प्रवासी सुविधा, वाहनतळ, रस्ते मजबुतीकरण आणि बॅकवॉटर विकासाशी संबंधित १०४ कामे पुढे नेली जाणार आहेत. दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी दोन स्वतंत्र शासन निर्णयांद्वारे ही मंजुरी देण्यात आली आहे. ‘सहाय्यक अनुदान, तरंगती जेट्टी व तत्सम प्रवासी सुविधा’ या योजनेसाठी १२६ कोटी, तर ‘बंदरापर्यंत रस्ते/रेल्वे मार्ग बांधणे आणि बॅकवॉटर विकास’ योजनेसाठी ४४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. (Konkan Development)
७५ कामांसाठी १२६ कोटी
पहिल्या योजनेअंतर्गत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ७५ कामांसाठी १२६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कामांची एकूण प्रशासकीय मान्यता ५७७.५३ कोटी रुपये असून, मार्च २०२६ अखेर १३३.९२ कोटी रुपये निधी प्राप्त झाला होता. जेट्टी दुरुस्ती, मजबुतीकरण, प्रवासी निवारे, पोहोचरस्ते, संरक्षण भिंती, पार्किंग आणि गाळ काढण्याच्या कामांचा यात समावेश आहे. रायगडमधील वसोली येथील रो-रो जेट्टी, पोहोचरस्ता, गाळ काढणे व दगडी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी १२ कोटी, तर आक्षीसागर येथील जेट्टी, पोहोचरस्ता, गाळ काढणे व तत्सम सुविधांसाठी १२ कोटी रुपयांची तरतूद आहे. (Konkan Development)
सिंधुदुर्गातील कामांना गती
सिंधुदुर्गातील कोचरा, भटवाडी, टेंबवली-मोडतर, वीरवाडी, संतवाडी, किनळे, ताम्हणेतर, सागरतीर्थ, सारंगवाडी-टेंबवली, अनपूर, मोंडतर आणि बांदरकरवाडी यांसह अनेक ठिकाणी जेट्टी, रस्ते आणि संरक्षण भिंतींची कामे सुरू आहेत. मुणगे आडबंदर येथील जेट्टी, पोहोचरस्ता आणि प्रवासी निवाऱ्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. मणचे येथील जेट्टी व रस्ते मजबुतीकरणाची तीन टप्प्यांतील कामेही १०० टक्के प्रगतीवर आहेत. विजयदुर्ग जेट्टी मजबुतीकरणासाठी ३.५० कोटी, तर विजयदुर्ग किल्ल्याजवळील जेट्टी व रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २.५० कोटी रुपयांची तरतूद आहे. (Konkan Development)
बंदरांपर्यंतच्या रस्त्यांसाठी ४४ कोटी
दुसऱ्या योजनेत २९ कामांसाठी ४४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ठाणे व पालघरमध्ये बंदरांकडे जाणारे रस्ते, संरक्षण भिंती आणि पोहोचरस्त्यांच्या मजबुतीकरणाचा समावेश आहे. पिंपळनेर, चिंचणी, सातपाटी, वडराई, खारेकुरण, राजोडी, कळंब, नारंगी रो-रो जेट्टी आणि मनोर या ठिकाणी कामे सुरू आहेत. (Konkan Development)
रायगडमधील रेवदंडा येथे रो-रो जेट्टी व संबंधित सुविधांसह बंदरापर्यंतच्या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. या कामाची प्रशासकीय मान्यता १७५.१५ कोटी रुपये असून, सध्या ३५ टक्के भौतिक प्रगती झाली आहे. करंजा ब्रेकवॉटरवरील रस्त्याचे काम ९८ टक्के, तर करंजा-कासवलेपाडा रस्त्याचे काम ८२ टक्के प्रगतीवर आहे. (Konkan Development)
पालघर जिल्ह्यातील बंदरांकडे जाणाऱ्या रस्त्यांचे मजबुतीकरण
जिल्ह्यातील १२हून अधिक कामांचा समावेश
पालघर जिल्ह्यातील बंदरांपर्यंतची वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पालघर जिल्ह्यात शंकर मंदिर ते दांडापर्यंतच्या रस्त्याचे मजबुतीकरण,पांजू येथील अस्तित्वातील रस्त्याचे मजबुतीकर, तसेच चिंचणी येथील खाडीनाका ते मोरीपाडा समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती व मजबुतीकरण करण्यात येणार आहे. चिंचणी येथील कामाची भौतिक प्रगती १०० टक्के असल्याचे शासनाच्या अहवालात नमूद आहे. (Konkan Development)
सातपाटी बंदराकडे जाणाऱ्या पोहोच रस्त्याचे मजबुतीकरण,वडराई येथील परमहंस आश्रमापर्यंतचा रस्ता, तसेच वडराई-सुळपाडा येथील समुद्राकडे जाणारा रस्ता या कामांचाही योजनेत समावेश आहे. यापैकी वडराईतील दोन्ही रस्त्यांच्या कामांची प्रगती १०० टक्के असल्याचे दस्तऐवजात नमूद आहे. (Konkan Development)
याशिवाय खारेकुरण येथील स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता मजबूत करणे आणि नाईक मैदानाकडे संरक्षक भिंत बांधणे,वाढीव येथील वाढीव गाव ते मोराबंदर रस्ता, राजोडी व कळंब येथील रस्ते व वाहनतळांचे मजबुतीकरण, तसेच नारंगी रो-रो जेट्टीकडे जाणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण अशी कामे प्रस्तावित आहेत. (Konkan Development)
मनोर येथील अस्तित्वातील जेट्टीच्या मजबुतीकरणालाही निधी मिळणार आहे. शासनाच्या आकडेवारीनुसार मनोरमधील हे काम १०० टक्के भौतिक प्रगतीवर आहे. (Konkan Development)
दरम्यान, पालघरमधील बंदरांकडे जाणारे रस्ते मजबूत झाल्याने किनारपट्टीवरील वाहतूक, बंदरांशी संपर्क आणि स्थानिक पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. (Konkan Development)
३१ मार्च २०२७ पर्यंत निधी खर्चाचे निर्देश
मंजूर निधी संबंधित कामांवरच खर्च करून ३१ मार्च २०२७ पूर्वी उपयोगिता प्रमाणपत्रे शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे कोकणातील सागरी संपर्क आणि बंदरांशी जोडणाऱ्या पायाभूत सुविधांच्या कामांना पुढील काळात अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे. (Konkan Development)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.