मुंबई (Mundhwa Land Case) : मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयाने जे काही विचारले त्याचे उत्तर पोलिस देतील. पोलिसांनी संपूर्ण चौकशी करून चार्जशीट केली आहे. उच्च न्यायालयाचे निरीक्षण पोलिस त्यांच्यासमोर मांडतील. या प्रकरणाची निष्पक्ष झाली आहे. त्यात कुठलाही किंतू परंतू राहिलेला नव्हता, अशी प्रतिक्रिया महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "महसूल खात्याच्या दृष्टीने लिहून देणारा आणि लिहून घेणारा हे दोघे महत्वाचे असून त्या दोघांवरही गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर कडक कारवाई झाली आहे. तसेच अधिकारीही बडतर्फ करण्याचा विचार आम्ही केला आहे. यापुढे शासकीय जमीन कुणाच्याही घशात जाणार नाही, याचाही विचार सरकारने केला आहे." (Mundhwa Land Case)
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार
ते पुढे म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या मंत्रिमंडळ बैठीकीत ज्याठिकाणी पावसाच्या अभामुळे पीके करपली आहेत तिथल्या सर्व शेतमालाचे आणि शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या नियमाप्रमाणे नुकसान भरपाई देण्याच्या सूचना मुख्य सचिव आणि प्रशासनाला दिल्या आहेत. महसुल, कृषी आणि ग्रामविकास हे तिन्ही विभाग मिळून सर्वेक्षण करणार असून शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे." (Mundhwa Land Case)
अमरावतीतील घटना पुन्हा होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याची गरज
"अमरावतीमधील स्त्री रुग्णालयात लागलेल्या आगीप्रकरणी सरकारने स्थापन केलेल्या चौकशी समितीचा अहवाल आला असून प्राथमिक तपासात संबंधित अधिकारी निलंबित झाले आहेत. तसेच व्हेंटिलेटर कंपनीवर कारवाई करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पण एवढ्यावरच हे प्रकरण थांबणार नाही. याप्रकरणात आणखी खोलात जावे लागेल. यानंतर असे प्रकार घडू नये यासाठी काय उपाययोजना कराव्या, याबाबत समितीने शिफारशी केल्या आहेत. राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये या शिफारशींची अंमलबजावणी झाली पाहिजे. अमरावती येथे मी स्वत: तिथले जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांशी बोलून एक चांगले मॉडेल रुग्णालय आणि जळून खाक झालेले लहान बाळांचे सेंटर आधुनिक करण्याची योजना करतो आहोत. पण राज्यात अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठीही उपाययोजना करण्याची गरज आहे," असेही ते म्हणाले. (Mundhwa Land Case)
मिरा-भाईंदरमध्ये भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना डब्यात कांदा-लसूण, बटाटा, बीट, कंदमुळांच्या भाज्या आणण्यास मनाई केली आहे. यावर बोलताना मंत्री बावनकुळे म्हणाले की, "एका शाळेत वेगवेगळ्या धर्माच्या आणि वेगवेगळ्या समाजाच्या परंपरा पाळतात. त्यामुळे या निर्णयाला वेगवेगळ्या धर्माचे विद्यार्थी कसे घेतील, ते सांगू शकत नाही. त्यांनी कशाच्या आधारावर हा निर्णय घेतला तेही मला माहिती नाही."
रोहित पवारांना नकारात्मकता तयार करायची आहे
"राष्ट्रीय महामार्ग जेव्हा बांधतात तेव्हा ते रस्ते आधीच झालेले असतात, त्यावर राष्ट्रीय महामार्ग पुढचे काम करते. पण नवीन मार्ग बांधायचा असल्यास माती कामापासून सर्व नवीन कामे उभी करावी लागतात. हे रोहित पवारांना कळते पण त्यांना नकारात्मकता तयार करायची आहे. शक्तीपीठ महामार्ग किंवा समृद्धी महामार्गाचा आराखडा तयार करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: डोळ्यात तेल घालून शासनाचा एकही पैसा जास्त जाणार नाही याकडे लक्ष दिले आहे," असे प्रत्युत्तरही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहित पवार यांच्या टीकेला दिले. (Mundhwa Land Case)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....