नाशिकमध्ये आगामी काळात होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असतानाच, विकासकामांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याला विनाकारण बदनाम न करण्याचे आवाहन विरोधकांना केले. नाशिकमध्ये आयोजित ‘भक्ती संगम’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुंभमेळ्याबाबत सुरू असलेल्या आरोपांवर भाष्य केले. कुंभमेळ्याच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करून या धार्मिक सोहळ्याला बदनाम करण्याचे कारस्थान काहीजण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. हे कारस्थान यशस्वी होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कुंभमेळ्याशी संबंधित सर्व प्रकल्प सार्वजनिक करण्यात आले असून, कोणतेही काम लपवून ठेवलेले नाही. त्यामुळे आरोप करण्यापेक्षा उपलब्ध माहितीची तपासणी करावी, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली.
भ्रष्टाचाराचे आरोप करताना ठोस पुरावे आणि वस्तुस्थितीच्या आधारे चर्चा होणे आवश्यक आहे. कारण, सिंहस्थ हा कोणत्याही एका पक्षाचा किंवा सरकारचा कार्यक्रम नसून तो लाखो भाविकांच्या श्रद्धेशी जोडलेला सोहळा आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. रस्ते, वाहतूक, पायाभूत सुविधा आणि इतर आवश्यक कामांना गती देण्यात येत आहे. काही कामांना विलंब झाल्याचे फडणवीस यांनी मान्य केले असून, त्यासाठी नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली.
सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. टीका करताना सिंहस्थाच्या धार्मिक आणि सांस्कृतिकतेचा महत्त्वाचा विचार होणे गरजेचे आहे. गैरव्यवहार आढळल्यास त्याची चौकशी झालीच पाहिजे; परंतु अपुर्या माहितीच्या आधारे संपूर्ण सोहळ्याची प्रतिमा मलीन करणे योग्य नाही. सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी शासनासोबतच नाशिककर, व्यापारी, स्वयंसेवी संस्था, युवक आणि विविध सामाजिक घटकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून या ऐतिहासिक सोहळ्याच्या यशासाठी सर्वांनी एकत्र येणे, हीच काळाची गरज!
...अन् राऊत पुन्हा बरळले!
एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर तोंडघशी पडलेल्या संजय राऊतांना प्रत्येक गोष्टीकडे केवळ राजकीय चष्म्यातून पाहण्याचे व्यसन जडले आहे. त्यामुळे दररोज सकाळी ते बिनकामाच्या मुद्द्याला हवा देऊन तापवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. त्यांच्या सातत्याने करण्यात येणार्या कुत्सित वक्तव्यांमुळे नाशिक आणि सिंहस्थाची प्रतिमा जाणीवपूर्वक मलीन केली जात आहे. प्रश्न विचारणे आणि संपूर्ण सिंहस्थ व्यवस्थेवरच अविश्वास निर्माण करणे यात मोठा फरक आहे, हे राऊतांना कोणीतरी जवळ बसून सांगण्याची गरज आहे.
नाशिकमध्ये सुरू असलेल्या प्रत्येक विकासकामाकडे भ्रष्टाचाराच्या संशयातून पाहणे आणि त्यातून संपूर्ण शहराची नकारात्मक प्रतिमा निर्माण होणे, हे नाशिककरांच्या हिताचे नाही. संजय राऊतांनी सरकारवर टीका करण्यापूर्वी एकदा नाशिकच्या नागरिकांच्या भावनांचाही विचार करावा. सिंहस्थ हा केवळ मुख्यमंत्री, मंत्री किंवा सत्ताधारी पक्षाचा कार्यक्रम नाही. नाशिकच्या व्यापार्यांपासून ते छोट्या व्यावसायिकांपर्यंत आणि स्थानिक नागरिकांपासून धार्मिक संस्थांपर्यंत सर्वांचे भवितव्य या सोहळ्याशी जोडलेले आहे. सरकारच्या एखाद्या निर्णयात गैरप्रकार असल्याचे ठोस पुरावे असतील, तर ते जनतेसमोर मांडावेत. चौकशीची मागणी करावी आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी सरकारवर दबाव आणावा. मात्र, पुराव्याऐवजी केवळ राजकीय आरोपांच्या माध्यमातून सिंहस्थाबद्दलच अविश्वास निर्माण करणे योग्य नाही. राऊतांनी सरकारला लक्ष्य करावे; मात्र नाशिकला लक्ष्य करू नये. राजकारण येते-जाते, सरकारे बदलतात; पण सिंहस्थाची परंपरा आणि नाशिकची प्रतिष्ठा कायम राहते. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून या ऐतिहासिक सोहळ्याच्या यशासाठी सकारात्मक भूमिका घेणे, हीच खरी जबाबदारी.
सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिकला जागतिक स्तरावर ओळख मिळण्याची संधी आहे. या संधीचे राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या धुरात नुकसान होऊ नये, एवढीच अपेक्षा नाशिककरांची आहे. संजय राऊतांनीही या भावनेचा आदर करून टीका करावी आणि सरकारवर निशाणा साधताना नाशिकची प्रतिमा जपावी. यातच संजय राऊत यांनी लक्षात घ्यावे, नाहीतर आता नाशकात १५ असलेले नगरसेवक कधी शून्य होतील, हे कळणारही नाही.