मुंबई : (Bapusaheb Deshmukh Passed Away) श्री गाडगे महाराज मिशन, मुंबईचे उपाध्यक्ष तथा श्री गाडगे महाराज ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त, नागरवाडी इंद्रभुवनाचे शिल्पकार आणि ज्येष्ठ समाजसेवक बापूसाहेब देशमुख यांचे आज दि. ९ रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने अमरावती येथे निधन झाले. संत गाडगेबाबांच्या सेवा, त्याग आणि निष्काम कर्मयोगाचा वसा आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत जपणाऱ्या या सेवाव्रती व्यक्तिमत्त्वाच्या निधनाने सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.(Bapusaheb Deshmukh Passed Away)
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, बापूसाहेब देशमुख यांच्या निधनाने संत गाडगेबाबांच्या विचारांची आणि सेवाकार्याची एक निष्ठावंत दीपज्योत हरपली आहे. अमरावती जिल्ह्यातील नागरवाडी येथे त्यांनी उभे केलेले सेवाकार्य, समाजासाठी केलेला त्याग आणि मानवतेप्रती असलेली त्यांची निस्सीम बांधिलकी सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.(Bapusaheb Deshmukh Passed Away)
बापूसाहेब देशमुख यांनी आपले संपूर्ण आयुष्य सेवा, त्याग, समर्पण आणि मानवतेसाठी वाहिले. संत गाडगेबाबांच्या विचारांना त्यांनी केवळ जपले नाही, तर ते प्रत्यक्ष कृतीतून समाजापर्यंत पोहोचविले. नागरवाडी येथे उभारलेले इंद्रभुवन हे त्यांच्या दूरदृष्टी, सेवाभाव आणि अथक परिश्रमाचे जिवंत प्रतीक मानले जाते. गरजू, वंचित आणि निराधार घटकांच्या सेवेसाठी त्यांनी सातत्याने कार्य केले. त्यांच्या निधनाने समाजसेवेच्या क्षेत्रातील एक समर्पित कर्मयोगी हरपला असून, त्यांनी रुजवलेले सेवासंस्कार आणि मानवतेचा वारसा पुढील पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहील, अशा भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहेत.(Bapusaheb Deshmukh Passed Away)