मुंबई: (National Book Lovers Day ) डिजिटल क्रांती आणि सोशल मीडियाच्या रीलच्या युगात वाचन संस्कृती हळूहळू कमी होत असल्याचं बोललं जातं. पण आजच्या 'नॅशनल बुक लव्हर्स डे' च्या निमित्ताने एक छान आणि सकारात्मक चित्र समोर येत आहे. आजच्या या धावपळीच्या काळातही तरुण पिढी पुस्तकांशी घट्ट जोडलेली दिसत असून, लोकल ट्रेनमधील प्रवासापासून ते रेल्वे स्थानकांवरील 'ओपन लायब्ररी' आणि पुस्तक प्रदर्शनांपर्यंत वाचन संस्कृती पुन्हा एकदा नव्याने रुजताना दिसत आहे.
लोकल ट्रेन आणि स्थानकांवर 'ओपन लायब्ररी'ची सुरेख संकल्पना
मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये जिथे बहुतांश प्रवाशांचे डोळे मोबाईलच्या स्क्रीनवर खिळलेले असतात, तिथेच आता अनेक तरुण-तरुणी हातात कादंबऱ्या, आत्मचरित्रे आणि वैचारिक पुस्तके घेऊन वाचनात मग्न असल्याचं दृश्य रोज पाहायला मिळतं. "स्क्रीन टाईम कमी करून मन शांत ठेवण्यासाठी पुस्तकांपेक्षा चांगला सोबती दुसरा असूच शकत नाही," अशीच भावना मुंबईतील तरुण वाचकांकडून व्यक्त होत आहे. (National Book Lovers Day)
वाचन संस्कृतीला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी आता रेल्वे प्रशासनानेही एक छान पुढाकार घेतला आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट रेल्वे स्थानकावर साऊथ कॉनकोर्स भागात 'लायब्ररी जंक्शन' नावाचा एक सुंदर उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या मोफत सार्वजनिक ग्रंथालयात कथा, कादंबऱ्या, बालसाहित्य, कॉमिक्स आणि वैचारिक अशा विविध विषयांवरील सुमारे १,२०० हून अधिक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. (National Book Lovers Day)
त्याच धर्तीवर मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस ,सीएसएमटी आणि ठाणे यांसारख्या प्रमुख स्थानकांवरही प्रवाशांसाठी 'ओपन लायब्ररी'ची सोय करण्यात आली आहे. ट्रेनची वाट पाहताना किंवा प्रवासादरम्यान मोफत पुस्तक घेऊन वाचण्याच्या या कल्पनेला प्रवाशांचा आणि तरुण वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. (National Book Lovers Day)
बुक कॅफे, 'बुकटॉक' आणि वाचनाची नवी लाट
केवळ रेल्वे स्थानकेच नाही, तर शहरातील 'बुक कॅफे' मध्येही वीकेंडला शांतपणे कॉफीचा आस्वाद घेत वाचनाचा आनंद लुटणाऱ्या तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळते. यासोबतच, इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर तरुण वर्ग केवळ रील न बघता 'बुकस्टाग्राम' आणि 'बुकटॉक' सारख्या हॅशटॅग्सद्वारे पुस्तकांची पुनरावलोकने (Reviews) शेअर करून इतरांनाही वाचनासाठी प्रेरित करत आहेत. (National Book Lovers Day)
'बुक लव्हर्स डे'चा इतिहास आणि महत्त्व
दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी जगभरात 'नॅशनल बुक लव्हर्स डे' साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात नेमकी कधी आणि कोणी केली, याचा अधिकृत इतिहास उपलब्ध नसला तरी, वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पुस्तकांचे आपल्या आयुष्यातील महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. (National Book Lovers Day)
स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या गदारोळातून थोडा वेळ बाजूला होऊन, एका शांत कोपऱ्यात आवडतं पुस्तक घेऊन बसणे आणि वाचनाचा समृद्ध आनंद घेणे, हाच या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. या निमित्ताने आजच्या दिवशी एकतरी नवं पुस्तक वाचण्याचा आणि वाचनाची ही सुंदर परंपरा अशीच पुढे नेण्याचा संकल्प केला जात आहे. (National Book Lovers Day)