मुंबई : (Sunil Tatkare on Prashant Kishor) प्रशांत किशोर यांची राजकीय रणनीतीकार म्हणून निवड झाल्याचे मला माहिती नाही. पण त्यांची आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट झाल्याचे मी वाचले. त्यांची औपचारिक भेट असल्याचे सुनेत्रावहिनींनी मला सांगितले. या भेटीत काय चर्चा झाली याचा तपशील मला माहीत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना खा. सुनील तटकरे म्हणाले की, “आम्ही सगळे थेरोटिकल पेक्षा जास्त प्रॅक्टिकल आहोत. मी कधीही माझ्या निवडणूकीचा सर्वे करून घेतला नाही. मी जमिनीवर काम करणारा असून मला अशा सर्वेची गरज नाही. मी पवार साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वात काम केले असून ८ वेळा महाराष्ट्र पालथा घातला आहे. प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी रणनीतीकार म्हणून काम करणार आहेत का, त्याबद्दल मला माहिती नाही. दीड महिन्यापूर्वी आमची भेट झाली होती. त्यानंतर ते निवडणूक लढले आणि विजयीही झालेत. आम्ही सगळे प्रॅक्टिकल असल्याने आणि जनतेला नेमके काय हवे हे आम्हाला माहिती असल्याने त्यापद्धतीने राज्यात पक्षाची बांधणी आलो आहोत. पण आता सल्ला मिळाला तर, तो ठीक आहे. काल केवळ सदिच्छा भेट झाली याचा अर्थ त्यांची नेमणूक केली असा अर्थ काढणे चुकीचे आहे. आम्ही भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये आहोत. पुढच्या कालावधीतही राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएसोबतच वाटचाल करणार आहे.” (Sunil Tatkare on Prashant Kishor)
फक्त सल्ल्यावर निवडणूकीत यश मिळत नाही
ते पुढे म्हणाले की, “२०१४ ला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झालो. त्या वर्षीची निवडणूक ही सर्वात आव्हानात्मक होती. आमच्या सर्वांवर त्यावेळी मोठ्या प्रमाणात आरोप झालेले असताना मला प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी आम्ही ४१ जागा जिंकलो. २०१९ ला आम्हाला ५१ जागांवर यश मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खोलवर काम करतो. सर्वेमुळे ढोबळमानाने अंदाज येत असतो. पण नुसत्या सल्ल्यावर यश मिळत नाही. जनतेत फिरावे लागते. आम्ही दादांसोबत एकेका मतदारसंघात फिरलो.” (Sunil Tatkare on Prashant Kishor)
आमच्या कोअर समितीची नियमित बैठक
“सुनेत्रा वहिनी आणि आमच्या कोअर समितीचा नियमित संपर्क असतो. आता संसदेचे अधिवेशन सुरु असल्याने प्रत्यक्षात भेट झाली नाही. परंतू, आमचा फोनवरही संपर्क असतो. कोअर समितीची बैठक नियमित होत असते आणि त्यातच सगळे निर्णय होत असतात. प्रशांत किशोर यांना राजकीय सल्लागार नेमले असल्याची माहिती माझ्याकडे नाही. त्यांना नेमले असते तर माझ्याकडे नक्कीच त्याबद्दलची माहिती असती. याचा अर्थ त्यांची नेमणूक केलेली नसावी,” असेही ते म्हणाले. तसेच रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच त्याबाबतचा निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले. (Sunil Tatkare on Prashant Kishor)
“संसदेच्या अधिवेशनात आपल्या लोकसभा मतदारसंघातील प्रश्न मांडण्याची संधी उपलब्ध होत असते. मात्र, यावेळी तशी संधी मिळाली नाही. त्यामुळे उपलब्ध असलेल्या वेळेत राज्यातील महत्वाच्या प्रश्नांसंदर्भात संबंधित मंत्र्यांची भेट घेतली. या भेटीतून आपल्याला काय न्याय मिळतो का या हेतूने मी जवळपास १० मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट झाली. यासोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री शिवराजसिंह चौहान, सी. आर. पाटील यांच्याशीही विविध विषयांवर चर्चा झाली,” असेही खा. सुनील तटकरे यांनी सांगितले. (Sunil Tatkare on Prashant Kishor)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....