मुंबई : (Project To Product To Patents) राज्यातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये संशोधन, नवोन्मेष आणि बौद्धिक संपदा निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेमार्फत आयोजित ‘प्रोजेक्ट टू प्रॉडक्ट टू पेटंट्स’ हा त्रिदिवसीय राज्यस्तरीय अध्यापक विकास प्रशिक्षण कार्यक्रम पुणे येथील एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, आळंदी येथे नुकताच पार पडला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये अधोरेखित करण्यात आलेल्या अनुभवाधारित व प्रकल्पाधारित शिक्षणाच्या अनुषंगाने आयोजित या प्रशिक्षणात ४० प्राध्यापकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.(Project To Product To Patents)
निव्वळ वर्गखोलीत विसावणाऱ्या प्रकल्पांना उत्पादन व पेटंटपर्यंत नेणारा सेतू उभारणे, हेच या कार्यशाळेचे मूळ सूत्र राहिले. फिशबोन डायग्राम, स्कॅम्पर व सिक्स थिंकिंग हॅट्ससारख्या नवसंकल्पन तंत्रांपासून ते हरित परिसर, पर्यावरण संवर्धन आणि विज्ञान आश्रमाच्या ‘करून शिकणे’ या तत्त्वज्ञानावर आधारित सत्रांपर्यंत बहुआयामी अनुभव सहभागींना लाभले. समारोपाच्या सत्रात, महाविद्यालयीन प्रकल्पांचे रूपांतर समाजोपयोगी उत्पादनांमध्ये करण्याचा आणि विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष व उद्योजकतेची बीजे रोवण्याचा संकल्प सहभागींनी केला.(Project To Product To Patents)
उपक्रमाचे उद्दिष्ट काय?
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या उद्दिष्टांनुसार विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष, संशोधनवृत्ती आणि उद्योजकता विकसित करण्यासाठी महाविद्यालयीन प्रकल्प केवळ शैक्षणिक उपक्रम न राहता त्यांचे उपयुक्त उत्पादन आणि पेटंटमध्ये रूपांतर व्हावे, या उद्देशाने ‘प्रोजेक्ट टू प्रॉडक्ट टू पेटंट्स’ हा त्रिदिवसीय राज्यस्तरीय अध्यापक विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या कल्पनांना योग्य दिशा देणे, त्या संशोधनाच्या माध्यमातून परिपक्व करणे, उद्योगजगताच्या गरजांशी जोडणे आणि बौद्धिक संपदा हक्कांच्या माध्यमातून पेटंटपर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया प्राध्यापकांना प्रभावीपणे समजावी, हा या प्रशिक्षणाचा प्रमुख हेतू होता. (Project To Product To Patents)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....