'आम्हाला आणखी एक केजरीवाल नको'

"सीजेपी"मध्ये फूट, दिपकेंच्या घराबाहेर 2 कार्यकर्त्यांचे उपोषण

    07-Aug-2026

CJP
 
छत्रपती संभाजीनगर : (CJP) कॉकरोच जनता पार्टीमधील अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. आम्हाला आणखी एक केजरीवाल नको, असा टोला लगावत सीजेपीच्या दोघा कार्यकर्त्यांनी संस्थापक अभिजित दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील घराबाहेर आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे सीजेपीत काहीच आलबेल नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
 
मनिष ब्रह्मभट्ट आणि राहुल पंड्या अशी या आंदोलकांची नावे असून,ते दोघेही मूळचे गुजरातमधील अहमदाबादचे आहेत. गेल्या महिन्यात दिल्लीत जंतरमंतरवर झालेल्या सीजेपीच्या आंदोलनात ते सक्रिय सहभागी होते. मात्र वाळुज एमआयडीसी परिसरातील अभिजित दिपके यांच्या घरी गुरुवारी झालेल्या सीजेपीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्या निषेधार्थ दोघांनी आमरण उपोषण सुरू केले. मात्र या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. (CJP)
 
यावेळी मनिष ब्रह्मभट्ट यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा उल्लेख करत, 'आम्हाला आणखी एक केजरीवाल नको', असा टोला दिपके यांना उद्देशून लगावला. सीजेपीचे आंदोलन सुरू झाले तेव्हा त्याला कोणताही चेहरा नव्हता. देशभरातील अनेक स्वयंसेवकांनी जंतर-मंतर आंदोलनात योगदान दिले. मीही त्यात सक्रिय होतो. मात्र, आज मला बैठकीसाठी बोलावले गेले नाही आणि माझी भेटही घेतली गेली नाही. संघटनेच्या भविष्याबाबतचे निर्णय काही मोजके नातेवाईक आणि मित्रमंडळी मिळून घेत आहेत. नेतृत्वाने असे एकतर्फी निर्णय घेऊ नयेत, अशा शब्दांत ब्रह्मभट्ट आणि पंड्या यांनी नाराजी व्यक्त केली. (CJP)
 
'क्या बोलती पब्लिक' सीजेपीची उचलेगिरी
 
येत्या सप्टेंबरपासून 'क्या बोलती पब्लिक' अशी व्यापक मोहीम देशभरात सुरू करण्याची घोषणा अभिजित दिपके यांनी गुरुवारी केली. मात्र यानिमित्ताने सीजेपीच्या उचलेगिरीची चर्चा सुरू झाली आहे. रेड एफएम 93.5 या रेडिओ वाहिनीवरील 'क्या बोलती पब्लिक' या पंचलाईनची कॉपी सीजेपीने केली, अशी टीका होऊ लागली आहे. (CJP)
 
सीजेपी ही आपची 'बी टीम'
 
कॉकरोच जनता पार्टी ही आम आदमी पार्टी अर्थात 'आप'चीच 'बी टीम' असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सीजेपीच्या कोअर टीममध्ये अजिंक्य शिंदे यांची संघटनप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे हे सध्या आपच्या महाराष्ट्र युवा आघाडीचे संयोजक असून पक्षाच्या राष्ट्रीय संघटन उभारणी समितीचे सदस्य आहेत. त्यांची अरविंद केजरीवाल आणि 'आप'च्या अन्य वरिष्ठ नेत्यांसोबतची अनेक छायाचित्रेही आहेत. (CJP)
 
 




संबंधित मजकूर