नागपूर : (Chandrashekhar Bawankule Mahayuti) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आहेत. पण महायुतीमध्ये कुठल्याही शंका, कुशंका किंवा डॅमेज होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे, अशी प्रतिक्रिया महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
रणनीतीकार प्रशांत किशोर आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह आम्ही सर्वांनी एक आचारसंहिता पारित केली आहे. तिन्ही पक्षांपैकी कुणीही परस्परांना डॅमेज करणार नाही किंवा एकमेकांच्या समोर येणार नाही, असा विचार करूनच चालायचे आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यात निश्चितपणे काहीतरी वेगळा विचार करतील. प्रशांत किशोर यांच्या भेटीबद्दल मला आज काही बोलायचे नाही. फक्त आम्ही सर्वांनी महायुतीमध्ये एकमेकांच्या मनात शंका उत्पन्न होतील, असे कुठलेही पाऊल उचलायचे नाही,” असे ते म्हणाले.(Chandrashekhar Bawankule Mahayuti)
जात पडताळणी समितीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही
मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, “जात पडताळणी समिती ही स्वायत्त आहे. त्यांच्या वर उच्च न्यायालय आहे. त्यामुळे कुठल्याही मंत्र्यांना, आमदारांना किंवा राजकीय लोकांना या समितीत हस्तक्षेप करता येत नाही. आकडेवारी बघितल्यास, प्रमाणपत्र कमी होण्याचे प्रमाण एक टक्क्यांपेक्षाही कमी आहे. मराठा समाजातील तीन लोकांचे प्रमाणपत्र रद्द झाले, तर ओबीसी समाजातही असे ११७ प्रकरणे असून जात पडताळणी समितीने त्यांचेही प्रमाणपत्र रद्द केले. मराठा समाजाला निर्गमित करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांपैकी फक्त एक टक्केच प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. उर्वरित ९९ टक्के ठिकाणी ते देण्यात आले. जात पडताळणी समितीच्या मध्ये बोलण्याचा अधिकार कुणालाही नाही. परंतू, या समित्या निश्चितपणे पारदर्शीपणे काम करत असतील. त्यांच्या कामाची उच्च न्यायालय दखल घेत असल्याने त्यांना नियमानुसारच काम करावे लागते.”(Chandrashekhar Bawankule Mahayuti)
लक्ष्मण हाके यांचे वक्तव्य अयोग्य
“लक्ष्मण हाके यांनी असे बोलणे योग्य नाही. प्रसाद लाड हे भाजपचे महत्वाचे नेते आहे. मराठा आणि ओबीसी समाजांमध्ये समन्वय करण्यासाठी त्यांची भूमिका महत्वाची आहे. दोन्ही समाज समोरासमोर येणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रसाद लाड यांनी घेतली आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीवर अशा पद्धतीने कुणी बोलू नये. प्रसाद लाड हे कधीही असंस्कारी काम करत नाही, ज्यातून त्यांच्यावर अशी टीका होईल. लक्ष्मण हाके यांना माझी सूचना आहे की, त्यांनी अशा पद्धतीने बोलू नये,” असेही मंत्री बावनकुळे म्हणाले.(Chandrashekhar Bawankule Mahayuti)
ते पुढे म्हणाले की, “एसआयआर प्रक्रियेत सर्वच पक्षांना बीएलए द्यायचे आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी बुथवर आपापले लोक सरकारी अधिकाऱ्यांसोबत काम करण्यासाठी दिले तर, अधिक चांगला एसआयआर होईल. भाजपचे लोक का फिरतात? हा आक्षेप घेणे योग्य नाही. राज ठाकरेंच्या पक्षाचे लोकही एसआयआर प्रक्रियेत अधिकाऱ्यांना मदत करण्यास तयार असल्यास त्यात काहीही वावागे नाही,” असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा वापर करण्याचे आवाहन केल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभारही मानले. (Chandrashekhar Bawankule Mahayuti)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....