सावजी विदर्भाची शान ! रेस्टॉरंट्स बंद पडतील असे बोलू नका; मुंढेंच्या ‘सावजी मटण' विधानावर महसूल मंत्री बावनकुळेंचा कडक प्रहार

    06-Aug-2026
 
Savji Mutton
 
मुंबई (Savji Mutton) : "सावजी हा व्यवसाय विदर्भाची शान आहे. हजारो कुटुंबांचा हा रोजगाराचा आधार असून, व्यवसाय बंद पडेल किंवा या उद्योगाला बळीचा बकरा बनवले जाईल अशी कोणतीही विधाने अधिकाऱ्यांनी करू नयेत," असा सज्जड इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
 
अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी मटणाबाबत केलेल्या विधानाचा तीव्र शब्दांत समाचार घेत महसूल मंत्र्यांनी सावजी व्यवसायाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका मांडली आहे. (Savji Mutton)
 
अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अमरावती येथील एका कार्यक्रमात "मी जर हे सावजी मटण खाल्ले, तर महिनाभर आजारी पडेन आणि हॉस्पिटलमध्ये जावे लागेल," असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानामुळे सावजी रेस्टॉरंट चालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांच्या अशा सरसकट वक्तव्यांवर कडक आक्षेप नोंदवला. (Savji Mutton)
 
 
 
बावनकुळे म्हणाले ,विदर्भामध्ये गेली तीन-चार पिढ्यांपासून सावजी रेस्टॉरंट्स अत्यंत प्रामाणिकपणे सुरू आहेत. सावजी ही मसाला आणि अन्नपदार्थ बनवण्याची एक आगळीवेगळी आणि पारंपरिक पद्धती आहे. विदर्भात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सावजीच्या जेवणाचा आस्वाद घ्यावासा वाटतो, इतकी या अन्नाची लोकप्रियता आहे. हे खास मसाले इतर कोणीही बनवू शकत नाही. आज जगातल्या अनेक देशांमध्ये सावजीच्या पदार्थांना मोठी मागणी असताना, एका अधिकाऱ्याने संपूर्ण उद्योगावर अशी सरसकट आणि नकारात्मक टिप्पणी करणे पूर्णपणे अयोग्य आहे. (Savji Mutton)
 
महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले की, अन्नात कुठे भेसळ किंवा आरोग्याला धोका निर्माण करणारी गोष्ट आढळल्यास त्या विशिष्ट ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यास कोणाचीही अडचण नाही. परंतु, संपूर्ण सावजी व्यवसायाला लक्ष्य करणे चुकीचे आहे. हा केवळ एक रेस्टॉरंट व्यवसाय नसून, घरातील पारंपरिक जेवण ग्राहकांपर्यंत पोहोचवणारा हा हजारो कुटुंबांचा मोठा गृहउद्योग आहे. त्यामुळे या व्यवसायाला फटका बसेल किंवा रेस्टॉरंट्स बंद पडतील, अशा स्वरूपाची वक्तव्ये अधिकाऱ्यांनी टाळावीत, असा स्पष्ट इशारा बावनकुळे यांनी दिला. (Savji Mutton)
 
 




संबंधित मजकूर