मुंबई : (Pune Nashik Railway Route DPR ) पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मूळ मार्गाचा जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप, खोडद (जि. पुणे) यावर होणारा संभाव्य परिणाम तपासण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे. माजी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत राहणार असून, ६० दिवसांत राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे.
राज्य सरकारच्या दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ डीपीआरमधील मार्ग जीएमआरटी वेधशाळेजवळून जात असल्याने वैज्ञानिक संस्था तसेच भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग आणि विज्ञान-तंत्रज्ञान विभागाने संभाव्य विद्युतचुंबकीय हस्तक्षेपाबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने अहिल्यानगर-शिर्डीमार्गे पर्यायी मार्ग निश्चित केला. मात्र मूळ मार्ग किंवा त्यात तांत्रिक बदल करून प्रकल्प राबविण्याची शक्यता तपासण्याची मागणी कायम होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने डॉ. काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. समितीत रेल्वे बोर्डाचे सदस्य विवेक गुप्ता, पुणे विभागीय आयुक्त आणि नाशिक विभागीय आयुक्त यांचा समावेश आहे. (Pune Nashik Railway Route DPR)
समिती मूळ आणि सुधारित मार्गांचा जीएमआरटी वरील परिणाम, बोगदे, उड्डाणपूल किंवा मर्यादित मार्गबदल यांसारख्या पर्यायांची तांत्रिक व्यवहार्यता, प्रवासाचा कालावधी, प्रकल्प खर्च, भूसंपादन, औद्योगिक व कृषी संपर्क तसेच सामाजिक-आर्थिक परिणामांचा तुलनात्मक अभ्यास करणार आहे. याशिवाय राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र , अणुऊर्जा विभाग, रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि संबंधित जिल्हा प्रशासनाशी सल्लामसलत करून समिती राज्य सरकारला स्पष्ट शिफारसी सादर करणार आहे. (Pune Nashik Railway Route DPR)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.