मुंबई (Gopinath Munde Farmer Accident Security Scheme) : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत आता शेतकऱ्यांसोबतच शेतमजुरांचाही समावेश करण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून सामाजिक सुरक्षेपासून वंचित असलेल्या घटकाला मंत्रिमंडळाच्या मान्यतेने न्याय देता आला. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ६ कोटी नागरिकांना सामाजिक सुरक्षा कवचाचा लाभ मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिली.
शेती हा केवळ शेतकऱ्यांचाच नव्हे, तर शेतमजुरांच्याही श्रमावर उभा असलेला व्यवसाय आहे. मात्र, आजवर शेतमजुरांना कृषि विभागाशी संलग्न असूनही कृषि विभागाच्या कोणत्याही योजनेमध्ये त्याचा विचार केला गेला नव्हता. अपघात सुरक्षा योजनेच्या संरक्षणापासून वंचित राहावे लागत होते. ही सामाजिक विषमता दूर करण्यासाठी कृषी राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी स्वतः पुढाकार घेत व्यापक अभ्यास करून शासनासाठी स्वतंत्र धोरणात्मक प्रस्ताव तयार केला. या निर्णयामुळे आता शेतीमध्ये प्रत्यक्ष श्रम करणाऱ्या शेतमजुरांनाही अपघाताच्या प्रसंगी सामाजिक संरक्षणाची हमी मिळणार आहे. शेतकऱ्यांसोबतच शेतीचा कणा असलेल्या शेतमजुरांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, या भूमिकेतून हा निर्णय पुढे नेण्यात आला. (Gopinath Munde Farmer Accident Security Scheme)
याबाबत कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल म्हणाले की, “शेतीमध्ये कष्ट करणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या आयुष्यात अपघात किंवा दुर्दैवी घटना घडल्यास त्यांना शासनाकडून आर्थिक आधार मिळणे अत्यंत आवश्यक होते. या योजनेअंतर्गत अनैसर्गिक मृत्यू, रेल्वे अपघात, वाहनअपघात, विज कोसळणे व झाडावरुन पडणे, दंगल, सर्पदंश, उष्माघातामुळे मृत्यू अशा विविध घटनांमध्ये पात्र लाभार्थ्यांना मदत दिली जाणार आहे."
सामाजिक न्यायाचा नवा अध्याय
“या योजनेअंतर्गत अपघाती किंवा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास २ लाख रुपये, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास २ लाख रुपये, तर अंशतः अपंगत्व आल्यास १ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. या योजनेची अंमलबजावणी १ एप्रिल २०२६ पासून करण्यात येणार आहे. ग्रामसभेने शेतमजूर म्हणून नोंद केलेल्या पात्र व्यक्तींनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. महायुती सरकारने शेतीचा कणा असलेल्या शेतमजुरांनाही सामाजिक सुरक्षेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तसेच यापूर्वी या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणी दुर करुन योजना सहज सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे. हा निर्णय ग्रामीण महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांसाठी दिलासादायक आणि सामाजिक न्यायाचा नवा अध्याय ठरेल. तसेच राज्याच्या कृषी क्षेत्रात सामाजिक सुरक्षेचा विस्तार करणारा आणि शेतकरी-शेतमजूर या दोन्ही घटकांना समान सन्मान देणारा हा निर्णय ग्रामीण महाराष्ट्रासाठी नवा विश्वास निर्माण करणारा ठरेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Gopinath Munde Farmer Accident Security Scheme)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....