वक्फ नोंदींच्या वादग्रस्त प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी विशेष बेंच; महसूलमंत्र्यांचा निर्णय

    05-Aug-2026   

Waqf Land Dispute Maharashtra
 
 
 
मुंबई : (Waqf Land Dispute Maharashtra) राज्यात ज्या प्रकरणांमध्ये मूळ मालकांच्या किंवा खाजगी मालकीच्या जमिनींवर वक्फ बोर्डाच्या नोंदी झाल्याबाबत वाद निर्माण झाले आहेत, अशा प्रकरणांची वस्तुस्थिती तपासून त्यांचा जलद आणि प्रभावी निपटारा करण्यासाठी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांच्या सदस्यतेखाली विशेष बेंच स्थापन करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. बेकायदेशीर नोंदी आढळल्यास त्या कायद्यानुसार तातडीने कमी करून पुढील कार्यवाही करण्याचेही त्यांनी निर्देश दिले.
 
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी नाशिक जिल्ह्यातील कळवण–सुरगाणा मतदारसंघातील मौजे दरेभणगी येथील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर झालेल्या वक्फ बोर्डाच्या नोंदीच्या प्रकरणाचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार नितीन पवार उपस्थित होते, तर नाशिकचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.(Waqf Land Dispute Maharashtra)
 
संबंधित प्रकरणाची वस्तुस्थिती तातडीने तपासून बेकायदेशीर नोंदी असल्यास त्या कमी करण्याची आणि कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश महसूल मंत्र्यांनी दिले. अशा स्वरूपाची प्रकरणे केवळ नाशिकपुरती मर्यादित नसून राज्यातील इतर भागातही आढळून येत असल्याने त्यांचा वेळेत आणि एकसमान पद्धतीने निपटारा व्हावा, यासाठी विशेष बेंच स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.(Waqf Land Dispute Maharashtra)
 
महसूल प्रशासकीय इमारत उभारण्यास मंजुरी
 
याच बैठकीत कळवण–सुरगाणा मतदारसंघातील मौजे धनेर दिगर, मौजे खर्डे दिगर आणि मौजे पुनद नगर येथील आकारी पडीत जमिनी मूळ मालकांना मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच आकांक्षित तालुका असलेल्या सुरगाणा येथे महसूल प्रशासकीय इमारत उभारण्यास मंजुरी देऊन आवश्यक निधीची तरतूद करण्यासाठी संबंधित विभागाने प्रस्ताव तातडीने सादर करावा, असेही त्यांनी निर्देशित केले.(Waqf Land Dispute Maharashtra)
 
'झिरो पेंडन्सी' हेच उद्दिष्ट असावे
 
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "महसूल विभागात 'झिरो पेंडन्सी' हेच उद्दिष्ट असले पाहिजे. नागरिकांना सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नयेत. विशेषतः आदिवासी बांधवांच्या जमिनी आणि हक्कांशी संबंधित प्रकरणांना सर्वोच्च प्राधान्य देऊन त्यांचा वेळेत निपटारा करावा.”(Waqf Land Dispute Maharashtra)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर