मुंबई, (Vengurla to Chipi Water Supply Scheme) : वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणी पुरवठा योजना गतिमान होणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासह १५०० केव्हीए क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाबाबत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून एक महिन्यात सविस्तर अहवाल सादर करावा,असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंगळवार दि.४ रोजी दिले आहेत. (Vengurla to Chipi Water Supply Scheme)
तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी पाणीपुरवठा योजना (टप्पा-२) तसेच या योजनेच्या वीज खर्चात बचत करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावासंदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस आमदार दीपक केसरकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव ए.नायक, वित्त विभागाचे सह सचिव डॉ माधव वीर,पाणी पुरवठा विभागाच्या सह सचिव गीता कुलकर्णी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कोकण विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे, नाबार्ड चे वरिष्ठ महाव्यवस्थापक अविनाश सेवलकर, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. (Vengurla to Chipi Water Supply Scheme)
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री पाटील म्हणाले, "सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाबरोबरच स्थानिक नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता ही योजना महत्वपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर नाबार्डच्या सहाय्यक महाप्रबंधकांनी संबंधित विभाग आणि वित्त विभागामार्फत सविस्तर प्रस्ताव शासनास सादर करावा." (Vengurla to Chipi Water Supply Scheme)
मंत्री पाटील म्हणाले, " वेंगुर्ला ते चिपी परिसर सागरी किनारपट्टीचा असल्याने गोड्या पाण्याची उपलब्धता मर्यादित आहे. त्यामुळे या परिसरातील विविध ग्रामपंचायतींनी तिलारी प्रकल्पाच्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी घेण्याची तयारी दर्शविली असून त्यासंदर्भातील ठराव व प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. भविष्यात चिपी विमानतळाचा विस्तार झाल्यास पाण्याची गरज आणखी वाढणार आहे. या योजनेची अंमलबजावणी झाल्यास स्थानिक नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्याबरोबरच पर्यटन आणि औद्योगिक विकासालाही चालना मिळणार आहे. तसेच पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून शासनाला पाणीपट्टीच्या स्वरूपात महसूलही प्राप्त होण्यास मदत होणार आहे. " (Vengurla to Chipi Water Supply Scheme)
वेंगुर्ला ते चिपी पाणीपुरवठा योजनेमुळे सागरी किनारपट्टी भागातील सुमारे ४० महसूली गावांना तसेच चिपी विमानतळाला मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे. सध्या या परिसरात विविध हॉटेल, पर्यटन आणि व्यावसायिक प्रकल्प उभारले जात असून भविष्यात या प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता भासणार आहे.