विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर रमले भात शेतीत; विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसमवेत भात लागवड
प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत येथे संशोधन प्रकल्पांची पाहणी;विद्यार्थी, शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांशी साधला संवाद; कृषी अभ्यास सहलीसाठी शहरी शाळांना आवाहन
मुंबई : (Rahul Narwekar Paddy Plantation) महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी बुधवारी कर्जत येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राला भेट देत विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसमवेत प्रत्यक्ष शेतात उतरून भात लागवड केली. यावेळी त्यांनी कृषी संशोधन प्रकल्पांची पाहणी केली, शास्त्रज्ञ, शेतकरी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधत नव्या पिढीला शेतीशी जोडण्यासाठी शहरी भागातील प्रत्येक शाळेने वर्षातून किमान एकदा कृषी अभ्यास सहलीचे आयोजन करावे, असे आवाहन केले.
शिक्षण प्रसारक मंडळ, मालाड संचलित उत्कर्ष मंदिर विद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आयोजित 'शास्त्रज्ञ, शेतकरी आणि विद्यार्थी संवाद' कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य विनायक काशीद, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय तोरणे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी. डी. वाघमोडे, विजय लेले, स्वप्नील सावरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.(Rahul Narwekar Paddy Plantation)
यावेळी बोलताना नार्वेकर म्हणाले की, भारत आज अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण असून इतर देशांनाही अन्नधान्य पुरवणारा देश बनला आहे. या यशामागे शेतकऱ्यांचे अथक परिश्रम असून देशाची अन्नसुरक्षा कायम राखण्यासाठी कृषी क्षेत्र अधिक सक्षम करणे आवश्यक आहे.
कृषी संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवाधारित शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शेतीची ओळख करून देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. भारताला २०२७ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवायचे असेल, तर शेतकरी सक्षम आणि समृद्ध असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.(Rahul Narwekar Paddy Plantation)
उत्कर्ष मंदिर विद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या कृषी अभ्यास सहलीचे त्यांनी विशेष कौतुक केले. राज्यातील सर्व शहरी शाळांनी वर्षातून किमान एकदा विद्यार्थ्यांना कृषी अभ्यास सहलीवर नेण्याचा उपक्रम राबवावा, असे आवाहन त्यांनी केले.
या दौऱ्यादरम्यान राहुल नार्वेकर यांनी विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसमवेत प्रत्यक्ष भात लागवडीत सहभाग घेतला. तसेच कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, भात जलद पैदास (स्पीड ब्रीडिंग) केंद्र आणि यांत्रिकी पद्धतीने भात लागवडीच्या प्रात्यक्षिकाची पाहणी करून संशोधन प्रक्रियेची माहिती घेतली.(Rahul Narwekar Paddy Plantation)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.