मुंबई : (Gen Z Revolution) नेपाळमध्ये युवकांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जेन झी आंदोलनाने देशाच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणला. जुन्या राजकीय व्यवस्थेविरोधातील असंतोषातून उभ्या राहिलेल्या त्यांच्या या आंदोलनामुळे सत्ताबदल झाला. केपी शर्मा ओली सरकारच्या सत्तांतरानंतर बालेन शाह यांचे सरकार नेपाळमध्ये आले. युवा नेतृत्व म्हणून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच दक्षिण-पूर्व नेपाळातील हिंदू-मुस्लीम तणाव, हिंसाचार आणि दोन हिंदू तरुणांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या संतापामुळे या आंदोलनातून अपेक्षित परिवर्तन झाले का, असा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे. त्याचबरोबर हिंदुराष्ट्र निर्मितीच्या मागणीलासुद्धा पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे.(Gen Z Revolution)
सुनसरी जिल्ह्यातील दिवानगंज येथे दि. २६ जुलै रोजी एका हिंदू धार्मिक कार्यक्रमादरम्यान मोठ्या आवाजातील संगीत आणि धार्मिक ध्वजांच्या वादातून दोन समुदायांमध्ये संघर्ष उफाळला. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईदरम्यान दोन हिंदू तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आणि आंदोलन अधिक तीव्र झाले. यानंतर अनेक शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून मोठा सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.(Gen Z Revolution)
दोन हिंदू तरुणांच्या मृत्यूनंतर हिंदू संघटनांनी सरकारवर हिंदूंच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. सोशल मीडियावरही या घटनेचा मोठा परिणाम दिसून आला. अनेक ठिकाणी हिंदू राष्ट्राच्या मागणीला नव्याने जोर मिळाल्याचे चित्र आहे. विशेषतः राजेशाही समर्थक पक्ष आणि हिंदू राष्ट्रवादी गटांनी धर्मनिरपेक्ष व्यवस्थेवर टीका करत नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी अधिक आक्रमकपणे मांडण्यास सुरुवात केली आहे.(Gen Z Revolution)
नव्या सरकारपुढे विश्वास टिकवून ठेवण्याचे आव्हान
गेल्या वर्षी नेपाळमध्ये झालेल्या जेन झी आंदोलनाने पारंपरिक राजकीय व्यवस्थेला मोठे आव्हान दिले आणि नव्या नेतृत्वाला सत्तेपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, भ्रष्टाचाराविरोधातील कठोर कारवाई, प्रशासनातील पारदर्शकता, रोजगारनिर्मिती आणि संस्थात्मक सुधारणांबाबत जनतेच्या अपेक्षांप्रमाणे वेगाने बदल झाल्याचे चित्र अद्याप दिसत नाही. त्यामुळे काही राजकीय विश्लेषकांच्या मते नव्या सरकारपुढे विश्वास टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.(Gen Z Revolution)
नागरिकांना शांतता राखण्याचे बालेन शाह यांचे आवाहन
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून हिंसाचाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. सरकारने अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केले असून हिंसाचारग्रस्त भागात परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारत-नेपाळ सीमेलगतच्या भागातही सुरक्षा वाढविण्यात आली आहे.(Gen Z Revolution)
बांगलादेशी-पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलवा; विविध संघटनांची मागणी
नेपाळमध्ये २६ जुलैच्या रात्री सुरू झालेल्या हिंसाचाराची तीव्रता आता कमी झाली असून, अनेक जिल्ह्यांतील तणावाची परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र, या घटनेनंतर विविध हिंदुत्ववादी संघटनांनी सरकारला १५ सूत्री मागण्यांचे निवेदन सादर केले असून, नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी संसदेत प्रस्ताव मांडण्याची प्रमुख मागणी केली आहे. या निवेदनात सुनसरी जिल्ह्यातील देवानगंज येथे झालेल्या हिंसाचाराची निष्पक्ष चौकशी, दोषी आणि कट रचणाऱ्यांना तातडीने अटक, तसेच चौकशी समितीचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे. (Gen Z Revolution)
याशिवाय गोळीबाराचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांची ओळख जाहीर करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच प्रशासकीय निष्काळजीपणा आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. निवेदनात हिंसाचारात मृत्यू झालेल्यांना शहीदाचा दर्जा द्यावा, त्यांच्या कुटुंबीयांना योग्य नुकसानभरपाई द्यावी आणि जखमींवर मोफत व प्रभावी उपचाराची व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.(Gen Z Revolution)
त्याचबरोबर बौद्ध आणि किरात परंपरांचा सन्मान राखत नेपाळची 'वैदिक सनातन हिंदू राष्ट्र' म्हणून पुनर्स्थापना करण्यासाठी संसदेत प्रस्ताव मांडावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांची ओळख पटवून त्यांना देशाबाहेर हाकलावे, सीमासुरक्षा अधिक मजबूत करावी आणि १९९० नंतर देण्यात आलेल्या नेपाळी नागरिकत्वांची चौकशी करावी, अशीही मागणी संघटनांनी केली आहे.(Gen Z Revolution)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक