मुंबई : (Sunetra Pawar) उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने टीका केल्याने राज्यातील राज्यातील वातावरण तापले आहे. मंगळवारी, या प्रकरणावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आमनेसामने आले होते.
काँग्रेस पक्षाने आपल्या 'एक्स' अकाऊंटवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा एक व्हिडीओ पोस्ट करत "सुनेत्रा पवार, अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील?" असा सवाल करत टीका केली. सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या आक्षेपार्ह उल्लेखामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.(Sunetra Pawar)
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद सुरु असताना तिथे अचानक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घुसले आणि जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. जोपर्यंत हर्षवर्धन सपकाळ माफी मागत नाही तोपर्यंत कार्यालयातून हलणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली. हर्षवर्धन सपकाळ यांची दुपारी २ वाजता तन्ना हाऊस येथील गांधी भवनमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण आणि दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयात जाऊन हे आंदोलन करण्यात आले.(Sunetra Pawar)
यामुळे काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. यासोबतच ठाणे आणि पुणे येथील काँग्रेसच्या कार्यालयांवरही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तसेच त्यांनी काँग्रेसवर महिलांचा अपमान केल्याचा आरोप केला. यामुळे काँग्रेस कार्यालयात काही काळ गोंधळ उडाला. अखेर पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर हा वाद शांत झाला.(Sunetra Pawar)
याआधीही झाला होता 'गुंगी गुडिया' शब्दप्रयोग
दरम्यान, याआधीही माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचा 'गुंगी गुडिया' असा उल्लेख करण्यात आला होता. समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांनी त्यांना 'गुंगी गुडिया' असे संबोधले होते. इंदिरा गांधी यांची सुरुवातीची राजकीय प्रतिमा स्वभावाची असल्याने त्यांच्यावर ही टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दलही काँग्रेसने आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राष्ट्रवादीकडून काँग्रेसचा जाहीर निषेध करण्यात आला.(Sunetra Pawar)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....