मुंबई: (Dard E Disco) शाहरुख खानच्या 'ओम शांती ओम' (२००७) या ब्लॉकबस्टर चित्रपटातील 'दर्द-ए-डिस्को' हे गाणे आजही लोकांच्या ओठांवर रेंगाळते. या गाण्याच्या निर्मितीमागे एक अत्यंत रंजक आणि मजेशीर किस्सा आहे, ज्याचा खुलासा दिग्दर्शिका फराह खान आणि गीतकार जावेद अख्तर यांनी एका पॉडकास्टमध्ये केला होता. (Dard E Disco)
गाण्याची सिच्युएशन आणि 'निरर्थक' शब्दांची मागणी
फराह खानला या गाण्यासाठी अशा शब्दांची गरज होती ज्यांचा काहीही ठोस अर्थ निघणार नाही .जावेद अख्तर यांनी पॉडकास्टवर बोलताना सांगितले होते, "जेव्हा तुम्हाला जाणीवपूर्वक निरर्थक किंवा अर्थ नसलेले शब्द लिहायला सांगितले जातात, तेव्हा ते अधिक कठीण असते. कारण तुम्ही विचार करून लिहायला लागलात की शब्दांना अर्थ प्राप्त होतो. फराहने मला स्पष्ट सांगितले होते की तिला अत्यंत विचित्र आणि निरर्थक बोल हवे आहेत. "(Dard E Disco)
"गुलझार साहेबांसारखं लिहा" आणि ५ मिनिटांत गाणे तयार!
फराह खानने 'टेक २' पॉडकास्टमध्ये जावेद अख्तर यांच्या गाणी लिहिण्याच्या सवयीबद्दल मजेशीर किस्सा सांगितला, जावेद अख्तर बऱ्याचदा गाणी लिहिताना खूप वेळ लावायचे आणि २ ओळी मिळण्यासाठी अनेक दिवसांची वाट पाहावी लागायची. फराहने त्यांना काम लवकर उरकण्यासाठी त्यांच्या प्रतिस्पर्धी आणि दिग्गज गीतकार गुलझार यांचे नाव घेऊन आव्हान दिले.फराहने त्यांना चिडवत म्हटले: "जावेद अंकल, काहीतरी गुलझार साहेबांसारखं लिहून द्या ना!"यावर जावेद अख्तर लगेच म्हणाले, "अच्छा! गुलझार साहेबांसारखं लिहायचं आहे का? थांब, आताच लिहितो!". आणि आश्चर्य म्हणजे, हे आव्हान स्वीकारून जावेद अख्तर यांनी अवघ्या ५ मिनिटांत 'दर्द-ए-डिस्को' गाण्याचे बोल लिहून पूर्ण केले. (Dard E Disco)