महाराष्ट्रात पहिल्यांदाच 'साहित्यरत्न दौड'! पिंपरी-चिंचवडमध्ये अण्णा भाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त धावले २२०० हून अधिक नागरिक

    04-Aug-2026
SahityaRatnaDaud2026 
पिंपरी-चिंचवड: (Pimpri Chinchwad News) लोकशाहीर, साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि आमदार अमित गोरखे युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यान चौकात ‘साहित्यरत्न दौड २०२६’ अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. महाराष्ट्रात पहिल्यांदाच 'साहित्यरत्न' या नावाने आयोजित करण्यात आलेल्या या दौडला नागरिक, युवक आणि क्रीडाप्रेमींचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला असून २२०० हून अधिक धावपटूंनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. (Pimpri Chinchwad News)

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या 'साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे पिंपरी-चिंचवड प्रबोधन पर्व २०२६' या साप्ताहिकाअंतर्गत हा भव्य उपक्रम राबवण्यात आला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, आमदार अमित गोरखे युथ फाऊंडेशन, आर्टी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि कलारंग यांच्या संयुक्त सहकार्याने या आगळ्यावेगळ्या दौडचे संयोजन करण्यात आले होते. (Pimpri Chinchwad News)

विचारांचा जागर, उत्साहाचा सागर

आमदार अमित गोरखे यांच्या कुशल नेतृत्वाखाली पार पडलेल्या या दौडमध्ये चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच गर्दी केली होती. पिंपरी-चिंचवडसह परिसरातील विविध शहरांतून आलेल्या हजारो नागरिकांच्या अफाट उपस्थितीने बर्ड व्हॅली उद्यान परिसर अक्षरशः दुमदुमून गेला. दौडला मेघराजाने दिलेली साथ आणि ढोल-ताशांचा गजर यामुळे वातावरणात विशेष उत्साह भरला होता. यावेळी मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वतः ढोल-ताशा वाजवण्याचा आनंद लुटला. (Pimpri Chinchwad News)

"अण्णा भाऊंचे विचार आजही प्रत्येकाच्या मनात आणि रक्तात रुजलेले आहेत!"

"लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार हे केवळ एका पिढीपुरते मर्यादित नसून ते संपूर्ण बहुजन समाजासाठी आणि युवाशक्तीसाठी सदैव मार्गदर्शक आहेत. 'साहित्यरत्न दौड २०२६' मधील अभूतपूर्व सहभागावरून अण्णा भाऊंचे विचार आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत असल्याचे स्पष्ट होते. युवकांना सकारात्मक ऊर्जा, उत्तम आरोग्य आणि सामाजिक समरसतेचा संदेश देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम यशस्वी ठरला असून, यापुढेही असाच वैचारिक वारसा आपण पुढे नेऊ."
— आमदार अमित गोरखे

शहर सुदृढ राहण्यासाठी स्तुत्य उपक्रम: आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

याप्रसंगी मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आमदार अमित गोरखे यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, "सहसा महापुरुषांच्या जयंतीनिमित्त बोधपर्व किंवा मिरवणुका काढल्या जातात. परंतु, शहर सुदृढ राहावे आणि नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, या उदात्त उद्देशाने आमदार गोरखे यांनी ही 'साहित्यरत्न दौड - रन फॉर हेल्थ' सुरू केली, ही खरोखरच अतिशय स्तुत्य आणि महाराष्ट्रातील पहिलीच संकल्पना आहे. २२०० हून अधिक नागरिकांनी क्रीडा भावनेने यात सहभाग घेतला. या यशस्वी आयोजनासाठी पोलीस प्रशासन, मनपा कर्मचारी आणि सर्व सहकाऱ्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो."  

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

या सोहळ्यास आमदार शंकर जगताप, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर, अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, भाजपा शहर अध्यक्ष शत्रुघन बापू काटे, उमेश चांदगुडे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना उपनेते इरफान सय्यद; कला, क्रीडा व सांस्कृतिक विभाग सभापती कैलास कुटे, नगरसेवक शितल शिंदे, तुषार हिंगे, मंदार देशपांडे, कुशाग्र कदम, योगेश बहल, बापूशेठ घोलप, नगरसेविका अनुराधा गोरखे, सदाशिव खाडे, नेताजी शिंदे, गणेश लंगोटे, राजू दुर्गे, कुणाल लांडगे, युवराज लांडे, देवदत्त लांडे, सुजाता पलांडे, वैशाली खाडे, धरम वाघमारे, मंगेश घाडगे, अनिता वाळुंजकर, मयूर काळभोर, सतीश बाराहते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (Pimpri Chinchwad News)

सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक

लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून वंचित, शोषित व बहुजन समाजाला स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाची प्रखर शिकवण दिली. त्यांच्या वैचारिक वारशाला अभिवादन करण्यासाठी आयोजित केलेली ही दौड केवळ एक क्रीडा स्पर्धा न राहता सामाजिक समरसता, आरोग्यदायी जीवनशैली आणि युवाशक्तीच्या एकत्रिकरणाचा एक मोठा सामाजिक उत्सव ठरली आहे. (Pimpri Chinchwad News)





संबंधित मजकूर