बीड: (Tukaram Mundhe) खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक कारवाईचा बडगा उचलला आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक निर्देशानंतर, अन्न सुरक्षा अधिकारी अ. दि. नरवाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी अंबाजोगाई शहरातील 'तवक्कल चायनीज सेंटर'वर धडक कारवाई केली. (Tukaram Mundhe)
ऑनलाईन तक्रारींची दखल; प्रशासनाकडून थेट कारवाई:
अंबाजोगाई शहरातील अनेक हॉटेल्स आणि चायनीज सेंटर्समध्ये चालणाऱ्या अस्वच्छतेबाबत तसेच विनापरवाना व्यवसायाबाबत नागरिकांकडून सतत ऑनलाईन तक्रारी नोंदवण्यात येत होत्या. नागरिकांच्या या तक्रारींची तातडीने दखल घेत एफडीएच्या पथकाने प्रत्यक्ष कारवाईचा मार्ग स्वीकारला. ऑनलाईन आलेल्या तक्रारींचा पाठपुरावा करत ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी पथकाने थेट घटनास्थळी धाड टाकली. (Tukaram Mundhe)
वैध परवान्याशिवाय सुरू होता व्यवसाय:
अन्न सुरक्षा अधिकारी अ. दि. नरवाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तवक्कल चायनीज सेंटरची अचानक पाहणी केली. या तपासणीदरम्यान हे सेंटर कोणत्याही वैध अन्न परवान्याशिवाय सर्रास चालवले जात असल्याचे उघडकीस आले. याशिवाय, अन्न तयार करण्याच्या ठिकाणी अत्यंत अस्वच्छता आढळून आल्याने पथकाने तातडीने कठोर पावले उचलली. (Tukaram Mundhe)
अन्नपदार्थांचे नमुने जप्त:
आरोग्यास घातक ठरेल अशा अस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, हॉटेलमधील अन्नपदार्थांचे नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, आवश्यक परवाना मिळेपर्यंत तवक्कल चायनीज सेंटर पूर्णपणे सील करण्यात आले आहे. (Tukaram Mundhe)
इतर ठिकाणांवरही अशीच कारवाई होणार ?
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या या धडक कारवाईचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच अंबाजोगाईत एकच खळबळ उडाली. कारवाईच्या भीतीने सदर बाजार भागातील बहुतांश हॉटेल्स आणि मांसविक्रीची दुकाने व्यावसायिकांनी तात्काळ बंद केली असून अनेक व्यावसायिक पसार झाले आहेत. दरम्यान, ऑनलाईन तक्रारींची दखल घेऊन झालेली परिसरातील ही मोठी कारवाई असल्यामुळे, आता शहरात नियमबाह्य व अस्वच्छ वातावरणात सुरू असलेल्या इतर हॉटेल्स आणि हातगाड्यांवरही एफडीए असाच बडगा उचलणार का? याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. (Tukaram Mundhe)