तत्पर मंत्री महाजन!

 
 
Girish Mahajan 
 
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर प्रशासनाने विकासकामे हाती घेतली आहेत. सिंहस्थात भाविकांच्या सुविधेसाठी रस्त्यांचे रुंदीकरण, नवीन उड्डाणपूल, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, गोदावरी नदीची स्वच्छता आणि इतर पायाभूत सुविधांची कामे सुरु आहेत. मात्र, ही विकासकामे नाशिककरांच्या मुळावरच उठली असून, खोदलेल्या रस्त्यांमुळे आतापर्यंत पाचजण आपल्या जीवाला मुकले आहेत. संपूर्ण शहर नांगरून ठेवल्याने दररोजची वाहतुककोंडी, धुळीचे साम्राज्य, चिखलयुक्त रस्ते आणि खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली. आधीच अनेक ठिकाणीची खोदकामे अपूर्ण, त्यात ठेकेदार बेपत्ता, अशा अपूर्णावस्थेतल्या या रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्याने, अपघातांचा आलेख खूपच वर गेला. अलीकडेच रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन, त्यात आणखी एका नागरिकाचा मृत्यू झाल्याने, अशा घटनांतील बळींची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
 
या पार्श्वभूमीवर कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेत, ते ‘अ‍ॅक्शन मोड’वर आले. शहरातील विकासकामांचा आढावा घेत, त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकार्‍यांसोबत तातडीच्या बैठकाही घेतल्या. रखडलेली कामे तातडीने पूर्ण करणे, धोकादायक खड्डे त्वरित बुजविणे, पावसाळ्यात सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना करणे आणि नागरिकांच्या अडचणी कमी करण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देत, बैठकीतूनच गैरहजर असलेल्या ‘एमएनजीएल’च्या अधिकार्‍यांना त्यांनी सज्जड दमही भरला. निष्काळजीपणा करणार्‍या संबंधित यंत्रणा आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याचाही इशारा त्यांनी यावेळी दिला. ‘सिंहस्थ हा नाशिकच्या प्रतिष्ठेचा आणि जागतिक स्तरावरील महत्त्वाचा धार्मिक सोहळा असल्याने विकासकामे आवश्यक असली, तरी ती नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड करून होऊ नयेत,’ अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली. त्यामुळे पुढील काळात नाशिककर समस्यामुक्त होतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
 
 
निर्णय स्वागतार्ह; पण...
 
बदलत्या जीवनशैलीमुळे अगदी जन्मजात बालकांनाही शारीरिक व्याधी असतेच. या समस्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून ही पिढी निरोगी राहाण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग आयुक्त तुकाराम मुंढे यांनी, एक स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. शाळांबाहेरील जंकफूड विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी शाळांच्या ५० मीटर परिसरात जंकफूड विक्रीवर निर्बंध घालण्याचा निर्णय, विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांच्या खांद्यावर टाकण्यात आल्याने, नाशिकच्या शिक्षण क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मधल्या सुटीत किंवा शाळा सुटल्यानंतर, विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर जंकफूडकडे आकर्षित होतात. परिणामी, लठ्ठपणा, मधुमेह, दातांचे आजार आणि इतर आरोग्यविषयक समस्या वाढत असल्याचे, वैद्यकीय तज्ज्ञ सातत्याने सांगत आहेत. त्यामुळे जंकफूड विक्रीवर नियंत्रण आणण्याचा निर्णय योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे.
 
परंतु, या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी हीच खरी कसोटी ठरणार आहे. मुख्याध्यापकांची प्राथमिक जबाबदारी शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज सांभाळण्याची असते. शिक्षकांचे नियोजन, विद्यार्थ्यांची शिस्त, परीक्षा, पालकांशी संवाद आणि विविध शासकीय कामे या जबाबदार्‍यांमध्ये ते आधीच व्यस्त असतात. अशा परिस्थितीत शाळेबाहेरील रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या जंकफूड विक्रीवर लक्ष ठेवणे आणि त्यावर कारवाई करणे, ही जबाबदारी त्यांच्यासाठी अवघड ठरू शकते. वास्तविक, ही जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था, अन्न व औषध प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या समन्वयातून पार पाडणे अधिक परिणामकारक ठरेल. नियमित तपासणी, अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती, तसेच शाळांमध्ये सकस आहाराचे महत्त्व पटवून देणारे उपक्रम राबविणेही तितकेच आवश्यक आहे. तुकाराम मुंढे यांनी घेतलेला निर्णय, विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी निश्चितच सकारात्मक असाच आहे. मात्र, केवळ आदेश काढून उद्दिष्ट साध्य होणार नाहीत. सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले, तरच विद्यार्थ्यांना आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट यशस्वी होऊ शकते, अन्यथा टीका करणारे टपलेलेच आहेत.
 




विराम विलास गांगुर्डे

दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये नाशिक विभागीय कार्यालयात उपसंपादक या पदावर कार्यरत. द्राक्षपंढरी म्हणून प्रसिध्द असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे जन्म आणि तेथेच बी. कॉम. ही पदवी, तर वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयातून प्राप्त. ग्रामीण जीवन आणि अर्थकारण, राजकीय आणि सामाजिक या विषयावरील वृत्तांकनामध्ये विशेष रस.
संबंधित मजकूर