मुंबई : (The Governance Challenge 2026) महाराष्ट्राला २०३५ पर्यंत देशातील अग्रगण्य इनोव्हेशन हब बनविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'द गव्हर्नन्स चॅलेंज (TGC) 2026' या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेची घोषणा केली आहे. 'समग्र' आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत देशातील ३६ नामांकित बिझनेस स्कूल आणि सार्वजनिक धोरण संस्थांमधील विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवार, दि.३ ऑगस्ट रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर या उपक्रमाची माहिती देत देशातील होतकरू विद्यार्थ्यांना सहभागाचे आवाहन केले. "महाराष्ट्राची नवोन्मेष परिसंस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि राज्याला देशातील आघाडीचे इनोव्हेशन हब बनविण्यासाठी धाडसी, व्यवहार्य आणि परिणामकारक उपाय सुचवा. तुमच्या कल्पना महाराष्ट्राच्या भविष्यातील विकासाला नवी दिशा देऊ शकतात," असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. (The Governance Challenge 2026)
'द गव्हर्नन्स चॅलेंज' ही शासन व्यवस्थेतील वास्तव समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आयोजित करण्यात येणारी भारतातील पहिल्या प्रकारची स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लाखो नागरिकांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या प्रशासकीय, विकासात्मक आणि धोरणात्मक आव्हानांसाठी नाविन्यपूर्ण, संशोधनाधारित आणि अंमलबजावणीयोग्य उपाय सादर करण्याची संधी मिळणार आहे. (The Governance Challenge 2026)
यंदाच्या स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना 'महाराष्ट्राला २०३५ पर्यंत देशातील अग्रगण्य इनोव्हेशन हब बनवणे' अशी आहे. शासन व्यवस्थेत नवकल्पना, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, धोरणनिर्मितीतील सुधारणा आणि तरुणांच्या सहभागातून राज्याच्या विकासाला नवी गती देण्यावर या उपक्रमाचा भर राहणार आहे. (The Governance Challenge 2026)
राज्यातील नवोन्मेष संस्कृतीला चालना देणे, शैक्षणिक संस्था आणि शासन यांच्यातील सहकार्य वाढविणे तसेच तरुणांच्या कल्पनांना प्रत्यक्ष धोरणांमध्ये स्थान मिळवून देणे, या दृष्टीने 'द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६' हा महत्त्वाचा उपक्रम ठरणार असल्याचे मानले जात आहे. (The Governance Challenge 2026)