व्हेल शार्कसाठी महाराष्ट्राची हाक

    31-Aug-2026   
 
Whale Shark in Maharashtra
 
जगातील सर्वांत मोठा मासा असलेल्या व्हेल शार्कच्या अस्तित्वावर मानवी हस्तक्षेपाचे सावट आहे. महाराष्ट्राच्या किनार्‍यावर त्याची उपस्थिती आणि जाळ्यात अडकण्याच्या घटना लक्षात घेता, या ‘सौम्य महाकाया’च्या संवर्धनासाठी राज्याने आता ठोस पावले उचलण्याची वेळ आली आहे. दि. ३० ऑगस्ट रोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय ‘व्हेलशार्क दिना’निमित्त याविषयी आढावा घेणारा हा लेख...
 
मासा, पण महाकाय!
 
व्हेल शार्कची लांबी १२ मीटरपेक्षा अधिक होऊ शकते आणि त्याचे वजन काही टन असू शकते. उपलब्ध नोंदींमध्ये १८ मीटरपर्यंतच्या व्यक्तींचाही उल्लेख आहे. तो समुद्रातील लहान प्लँक्टन, क्रिल, कोपेपॉड्स, माशांची अंडी व अळ्या, तसेच लहान मासे गाळून खातो. त्यामुळे एवढ्या मोठ्या आकाराच्या जीवासाठी माणूस किंवा मोठे मासे हे भक्ष्य नसतात. तो तोंडात मोठ्या प्रमाणात पाणी घेऊन त्यातील अन्न गाळून खातो. व्हेल शार्कच्या जीवनातील अनेक बाबी आजही गूढ आहेत. त्याचे प्रजनन, पिल्लांना जन्म देण्याची ठिकाणे आणि पिल्लांची सुरुवातीची जीवनशैली यांबाबत अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. मादी व्हेल शार्क साधारण नऊ ते दहा मीटर लांबीवर लैंगिक परिपक्वतेला पोहोचते आणि तिचे पहिले प्रजनन वय साधारण ३० ते ४० वर्षे असू शकते, अशी संशोधनातून माहिती पुढे आली आहे. त्यामुळे एखाद्या लोकसंख्येवर मोठा परिणाम झाल्यास तिची भरपाई होण्यास अनेक दशके लागू शकतात.
 
समुद्राच्या निळ्याशार अथांग विश्वात एखाद्या छोट्या पाणबुडीसारखा संथपणे वावरणारा, पण प्रत्यक्षात जगातील सर्वांत मोठा मासा असलेला जीव म्हणजे व्हेल शार्क (Rhincodon typus). नावात ‘व्हेल’ असले, तरी हा सस्तन प्राणी नसून ‘शार्क’ अर्थात मासा आहे. आपल्या प्रचंड आकारमानामुळे, अंगावरील वैशिष्ट्यपूर्ण पांढर्‍या ठिपक्यांमुळे आणि माणसांबद्दल तुलनेने निरुपद्रवी स्वभावामुळे त्याला समुद्रातील ‘सौम्य महाकाय’ म्हटले जाते. मात्र, या महाकाय जीवाचे अस्तित्व आज धोक्यात आहे. ‘आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटने’ने (IUCN) ‘व्हेलशार्क’ला "EndangeA°ed' म्हणजेच ‘संकटग्रस्त’ श्रेणीत स्थान दिले आहे.
 
महाराष्ट्रातील ‘व्हेलशार्क’
 
व्हेल शार्क केवळ गुजरातच्या समुद्रापुरता मर्यादित नाही. भारताच्या संपूर्ण किनारपट्टीवर त्याची नोंद आहे. महाराष्ट्राच्या किनार्‍यावरही या प्रजातीची उपस्थिती ऐतिहासिकदृष्ट्या नोंदली गेली आहे. मुंबईच्या ‘न्यू फेरी व्हार्फ’ येथे मासेमारीच्या नौकांमधून अपघातीरीत्या व्हेल शार्क पकडले गेल्याच्या नोंदी आहेत. महाराष्ट्राच्या किनार्‍यावरील पारंपरिक मच्छीमारांच्या अनुभवातूनही त्याची उपस्थिती स्पष्ट होते. मुंबई, ठाणे आणि रायगडमधील मच्छीमारांनी गुजरातच्या सौराष्ट्र किनार्‍याजवळ व्हेल शार्क पाहिल्याचे सांगितले, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील मच्छीमारांनी मालवणच्या समुद्रात त्याची उपस्थिती नोंदवली आहे. एका पश्चिम किनारा सर्वेक्षणात महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमधील ५५ मच्छीमारांनी मालवण परिसरात व्हेल शार्क पाहिल्याचे नमूद केले आहे. महाराष्ट्रातील डोलनेट मत्स्यव्यवसायाच्या क्षेत्रात व्हेल शार्कच्या आहार व वर्तनावरही अभ्यास झाला आहे. यावरून हा जीव महाराष्ट्राच्या किनारी परिसंस्थेशी केवळ अधूनमधून संबंधित दिसत नसून, काही विशिष्ट भागांत हंगामी स्वरूपात दिसू शकतो, असे संकेत मिळतात.
 
महाराष्ट्रातील प्रयोग
 
महाराष्ट्राने व्हेल शार्क संवर्धनासाठी मच्छीमारांना थेट सहभागी करून घेण्याचा महत्त्वाचा प्रयोग केला आहे. कांदळवन कक्षाच्या ‘सागरी जीव सुटका व भरपाई’ उपक्रमांतर्गत मासेमारीच्या जाळ्यात अडकलेल्या संरक्षित सागरी जीवांची सुटका करणार्‍या मच्छीमारांना आर्थिक प्रोत्साहन दिले जाते. कांदळवन कक्षाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, या उपक्रमातून आतापर्यंत ५४७ सागरी जीवांची सुटका झाली असून त्यात ४५ व्हेल शार्कचा समावेश आहे. ऑलिव्ह रिडले आणि ग्रीन सी कासवांनंतर व्हेल शार्कची संख्या या यादीत लक्षणीय आहे. हा आकडा केवळ बचावकार्याचा नाही, तर मच्छीमार आणि वनविभाग यांच्यात निर्माण झालेल्या संवर्धनाच्या भागीदारीचेही उदाहरण आहे. जाळ्यात अडकलेल्या महाकाय व्हेल शार्कला वाचवताना मच्छीमारांचे जाळे खराब होणे किंवा मासेमारीचे नुकसान होण्याची शक्यता असते. अशा वेळी आर्थिक प्रोत्साहनाची ही व्यवस्था ‘संरक्षित जीव वाचवणे’ आणि ‘मच्छीमाराचे नुकसान भरून काढणे’ या दोन्ही बाबी जोडते. या माध्यमातून मच्छीमारांना २५ हजार रुपयांची भरपाई मिळते.
 
अरबी समुद्रातील भ्रमंती
 
व्हेल शार्क अत्यंत स्थलांतरशील आहे. २०२१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या उपग्रह-टेलिमेट्री अभ्यासात गुजरातमध्ये टॅग केलेल्या व्हेल शार्कपैकी काही व्हेल शार्क गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनार्‍यादरम्यानच्या समुद्रात फिरत असल्याचे दिसून आले. एका शार्कने केवळ ४० दिवसांत दोन हजार किमीचा प्रवास केला आणि महाराष्ट्राच्या किनार्‍यापासून सुमारे ४० किमी अंतरापर्यंत पोहोचल्याचे नोंदले गेले. याचा अर्थ महाराष्ट्राच्या समुद्रातील व्हेल शार्क संवर्धनाचा विचार केवळ राज्याच्या सागरी सीमांपुरता करून चालणार नाही. गुजरात-महाराष्ट्र-गोवा-कर्नाटक या संपूर्ण पश्चिम किनारपट्टीकडे एक सलग अधिवास म्हणून पाहण्याची गरज आहे.
 
कायद्याने संरक्षण, पण धोके कायम
 
भारताने व्हेल शार्कच्या संरक्षणासाठी ऐतिहासिक पाऊल उचलत दि. २८ मे २००१ रोजी त्याला ‘वन्यजीव संरक्षण कायद्या’च्या अनुसूची-ख मध्ये समाविष्ट केले. त्यामुळे त्याला देशातील सर्वोच्च कायदेशीर संरक्षण मिळाले आणि त्याची शिकार, पकड व व्यापार हा गंभीर गुन्हा ठरला.
 
या संरक्षणामुळे भारतात लक्ष्यित व्हेल शार्क मत्स्यव्यवसाय मोठ्या प्रमाणात थांबला. मात्र, संकट पूर्णपणे संपलेले नाही. व्यावसायिक मासेमारीच्या जाळ्यांमध्ये अपघाती अडकणे, जहाजांची धडक, अधिवासातील बदल, समुद्रातील प्रदूषण आणि अन्नसाखळीतील बदल हे आजही महत्त्वाचे धोके आहेत. ’IUCN’ च्या मते गेल्या ७५ वर्षांत जागतिक ‘व्हेलशार्क संख्येत निम्म्यापेक्षा अधिक घट झाली आहे.

गुजरातचा अनुभव महाराष्ट्रासाठी आदर्श
 
भारताच्या व्हेल शार्क संवर्धनाची सर्वांत उल्लेखनीय कथा गुजरातची आहे. एके काळी सौराष्ट्र किनार्‍यावर व्हेल शार्कची लक्ष्यित शिकार होत असे. मात्र, कायदेशीर संरक्षणासोबतच वन्यजीव संस्थांनी आणि गुजरात वनविभागाने मच्छीमारांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. परिणामी, पूर्वी शिकार करणार्‍या अनेक मच्छीमारांनीच व्हेल शार्कचे रक्षणकर्ते म्हणून भूमिका स्वीकारली. आज मच्छीमारांच्या मदतीने अपघाताने जाळ्यात अडकलेल्या व्हेल शार्कची सुटका केली जाते. २०२४-२५ या कालावधीत गुजरातमध्ये ३५ व्हेल शार्कची सुटका करण्यात आली आणि प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनची संख्या ९७९ वर पोहोचली असल्याचे WTIच्या वार्षिक अहवालात नमूद आहे.

महाराष्ट्रासाठी पुढचे पाऊल काय?
 
महाराष्ट्राच्या किनार्‍यावर व्हेल शार्कच्या नियमित आणि शास्त्रीय पद्धतीने नोंदी करण्याची आज मोठी गरज आहे. मालवण, रत्नागिरी, रायगड आणि मुंबईच्या समुद्रात मच्छीमारांच्या पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करून ‘व्हेल शार्क हॉटस्पॉट’ निश्चित करता येतील. त्यासाठी मच्छीमार, संशोधक, मत्स्यविभाग, वनविभाग आणि संवर्धन संस्था यांच्यात समन्वय आवश्यक आहे.
 
जाळ्यात अडकलेल्या व्हेल शार्कची सुरक्षित सुटका करण्याचे प्रशिक्षण मच्छीमारांना देणे, अपघाती पकडींची नोंद ठेवणे, फोटो-आधारित ओळख व डेटाबेस तयार करणे, उपग्रह टॅगिंगद्वारे हालचालींचा अभ्यास करणे आणि महत्त्वाच्या अधिवासांचे संरक्षण करणे, ही पुढील काळातील महत्त्वाची पावले ठरू शकतात.




अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

संबंधित मजकूर