पाकिस्तानात शिखांचा टाहो

    31-Aug-2026
Atrocities on Sikhs in Pakistan
 
 
दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानने, प्रारंभीपासूनच अल्पसंख्याकांना पद्धतशीरपणे संपविण्याचे कारस्थान अमलात आणले आहे. कधी बळजबरी धर्मांतरातून, कधी त्यांची घरे, दुकाने जाळून, कधी मुलीबाळींवर अत्याचार करून, तर कधी ईशनिंदेचा ठपका ठेवत निष्पापांची हत्या केली. या घटनांना तेथील सरकार अप्रत्यक्ष पाठिंबा देत असल्याचेच, अलीकडच्या एका घटनेमधून समोर आले. बलुचिस्तान प्रांतातील शिखांचे श्रद्धास्थान असलेल्या, सुमारे २०० वर्षे जुन्या ऐतिहासिक श्री गुरु सिंह सभा गुरुद्वाराचे बेकायदेशीरपणे पाडकाम करण्यात आले. या जागेवर आता एका मॉलची उभारणी केली जाणार आहे. दुर्दैव म्हणजे, ऐतिहासिक धार्मिक स्थळांचे जतन करण्याची जबाबदारी तेथील सरकारची असते. मात्र, सरकार सोडाच, बलुचिस्तान उच्च न्यायालयानेही या पाडकामाला हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे सरकारसोबत लोकशाहीचे आधारस्तंभ असलेले प्रशासन आणि न्यायालय यांनी हातमिळवणी करत, अल्पसंख्याकांच्या प्रार्थनास्थळांना लक्ष्य करण्याचा विडाच उचलल्याचे चित्र आहे.
 
या घटनेचे पडसाद सर्वदूर उमटले असून, शिखांसह हिंदू धर्मीयांमध्येही संतापाची लाट आहे. मात्र, धर्मांध झालेल्या या देशाला त्याचे सोयर-सुतक नाही. स्थानिक प्रशासन आणि पंजाब प्रांतीय सरकारने, सुरुवातीला या घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. मात्र, संतापाचे लोण पसरल्यावर त्यांना खडबडून जाग आली. पाकिस्तान सरकार आणि स्थानिक प्रशासनाने निव्वळ शाब्दिक निषेध नोंदवत, पोकळ आश्वासनांवरच स्थानिक शीख समुदायाची बोळवण केली. सरकारच्या या हतबलतेमागे कट्टरतावादी गटाच्या तुष्टीकरणाचे कारण असल्याचे सत्य, पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. एकीकडे भारतातील पंजाबी शिखांना खलिस्तानच्या नावे पाकिस्तान उसकवतो आहे, तर दुसरीकडे स्वतःच्या देशातच शिखांची कत्तल करण्यापासून ते गुरुद्वारा उद्ध्वस्त करण्यापर्यंत यांची मजल जाते.
 
पाकिस्तानात अल्पसंख्याकांना आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांना लक्ष्य करण्याचे प्रकार आजचे नाहीत. फाळणीदरम्यान पाकिस्तानमधील शिखांची संख्या अंदाजे २० लाख इतकी लक्षणीय होती. २०२३च्या जनगणनेनुसार, पाकिस्तानात आता केवळ १५ हजार, ९९८ एवढेच शीख बांधव उरले आहेत. २००९-२०१० मध्ये पाकिस्तानच्या आदिवासी भागात सक्रिय असलेल्या ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या दहशतवादी संघटनेने, शिखांवर इस्लामी ‘जिझिया’ हा धार्मिक करही लादला होता. कर न देऊ शकणार्‍या शिखांची घरे पाडण्यात आली, आणि त्यांना हाकलूनही देण्यात आले.
 
२०२० मध्ये शिखांचे सर्वांत पवित्र स्थळ असलेल्या ननकाना साहिब गुरुद्वाराला वेढा घालून, दगडफेकही करण्यात आली. सिंध प्रांतातल्या काही शहरांमध्ये, हिंदू मंदिरांमध्ये ठेवलेल्या शीख धर्मग्रंथ ‘गुरु ग्रंथ साहिब’ यांच्या विटंबनेचे प्रकारही समोर आले.
पाकिस्तानच्या संसदीय समितीने संसदेत सादर केलेल्या एका अहवालानुसार, एके काळी पाकिस्तानमध्ये १ हजार ८१७ हिंदू मंदिरे आणि गुरुद्वारा होते. आज या भूभागातील अल्पसंख्याकांच्या सुरु धार्मिक स्थळांची संख्या अवघ्या ३७ आहे.
 
बलुचिस्तानमध्ये एके काळच्या १२ पैकी, आता केवळ दोनच गुरुद्वारे अस्तित्वात आहेत. अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थळांच्या घसरणीचा हा आलेख, तेथील दहशतवादाची दाहकता अधोरेखित करतो.
 
धार्मिक छळ, जीवघेणे हल्ले, भेदभावाची वागणूक, सक्तीचे धर्मांतर, महिलांवर अत्याचार, प्रार्थनास्थळांना लक्ष्य या कारणास्तव, पाकिस्तानातून अल्पसंख्याकांचे स्थलांतर मोठ्या संख्येने झाले. आजही ते होत आहे. यावरूनच या देशातील दहशतवादाचा हिंसक चेहरा उघड होतो. मात्र, धर्मवेडे सरकार डोळे झाकून बसले आहे. आपली चूक मान्यच करायची नसेल, तर त्यांच्याकडून सुधारणा करण्याची अपेक्षा ठेवणे म्हणजे पोरखेळच. त्यामुळेच दहशतवादाला पोसणार्‍या या देशात, प्रगतीचे तीनतेरा वाजले आहेत. प्रचंड महागाई, बेरोजगारीने या देशातील लोक भरडले असून, ते सरकारविरोधात रस्त्यावर उतरत आहेत. देशाच्या प्रगतीकडे दुर्लक्ष करून, दहशतवाद्यांना खुश करण्यासाठी अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्याचे धोरण आणखी काही वर्षे असेच सुरू राहिले, तर पुढच्या काही वर्षांत या देशाचे कर्ज आणखी नक्कीच वाढणार असून, तो ‘महाभिकारी’ होईल, हे निश्चित!
 
-रोहित गुरव




संबंधित मजकूर