पुणे (MIT-WPU Placements 2026) : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटी-डब्ल्यूपीयू), पुणे येथे २०२६चा प्लेसमेंट हंगाम यशस्वी ठरला आहे. यंदाच्या प्लेसमेंट प्रक्रियेत तब्बल ७५० आघाडीच्या कंपन्यांनी सहभाग घेतला, तर आयटी, कोअर इंजिनिअरिंग, कन्सल्टिंग, ॲनालिटिक्स, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोटिव्ह, ऊर्जा, एफएमसीजी आणि बीएफएसआय अशा विविध क्षेत्रांमध्ये २ हजार ५००हून अधिक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यामुळे आघाडीच्या कंपन्यांसाठी एमआयटी-डब्ल्यूपीयू हे पसंतीचे केंद्र ठरत असल्याचे स्पष्ट होते.
गेल्या काही वर्षांत विद्यापीठाच्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सहभागी होणाऱ्या कंपन्यांच्या संख्येत सातत्याने वाढ झाली आहे. यामुळे विद्यापीठाचा वाढता औद्योगिक संपर्क तसेच विद्यार्थ्यांची तांत्रिक, विश्लेषणात्मक आणि समस्या सोडवण्याची क्षमता अधोरेखित होत आहे. अनेक नामांकित कंपन्यांनी प्लेसमेंट प्रक्रियेच्या सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यावसायिक तयारीवर विश्वास व्यक्त केला.
यंदाच्या प्लेसमेंट हंगामात ॲमेझॉन, एनव्हिडिया (Nvidia), जेपी मॉर्गन, मॉर्गन स्टॅनले, आयबीएम, ओरॅकल, कॉग्निझंट, ॲक्सेंचर, बार्कलेज, डेलॉइट, डॉइश बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, टीसीएस, टाटा मोटर्स, विप्रो, महिंद्रा अँड महिंद्रा, केपीएमजी, कॅपजेमिनी यांसह अनेक दिग्गज कंपन्यांचा सहभाग होता. या जगप्रसिद्ध कंपन्यांची विविधता विद्यापीठाचे जागतिक उद्योग क्षेत्रांमधील मजबूत स्थान दर्शवते. (MIT-WPU Placements 2026)
४६ लाखांचे सर्वाधिक पॅकेज
२०२६च्या प्लेसमेंट हंगामात २०० हून अधिक विद्यार्थ्यांना वार्षिक १० लाख रुपयांपेक्षा अधिक पॅकेजची ऑफर मिळाली आहे. तर विद्यापीठातील विद्यार्थ्याला वार्षिक ४६ लाख रुपयांचे सर्वोच्च पॅकेज मिळाले आहे. हे एमआयटी-डब्ल्यूपीयूमधील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या उज्ज्वल भविष्यातील संधींची गुणवत्ता आणि व्यापकता दर्शवते. (MIT-WPU Placements 2026)
एमआयटी-डब्ल्यूपीयूचे चीफ अकॅडेमिक ऑफिसर डॉ. प्रसाद डी. खांडेकर म्हणाले, "जागतिक बाजारपेठेतील आर्थिक दबाव आणि भू-राजकीय अनिश्चितता असूनही, एमआयटी-डब्ल्यूपीयूच्या प्लेसमेंट निकालांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. या हंगामाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इंटर्नशिपचे प्री-प्लेसमेंट ऑफर्समध्ये (PPOs) झालेले रूपांतर. हे विद्यार्थ्यांच्या कौशल्य आणि कार्यक्षमतेबद्दल कंपन्यांचे समाधान दर्शवते. कॅम्पसला भेट देणाऱ्या कंपन्यांची संख्या सतत वाढत असून, जवळपास ९० टक्के कंपन्या दरवर्षी पुन्हा येतात. हा एमआयटी-डब्ल्यूपीयूच्या विद्यार्थ्यांवर असलेला दृढ विश्वास आणि विद्यापीठाच्या मजबूत उद्योग-शैक्षणिक सहकार्याचा परिणाम आहे."
सेंटर फॉर इंडस्ट्री अँड अकॅडेमिया पार्टनरशिप्सचे (CIAP) संचालक मानस मोहंती यांनी सांगितले की, मजबूत औद्योगिक भागीदारीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार करिअरच्या संधी निर्माण करण्यावर संस्थेचा भर आहे. विद्यार्थ्यांना गतिमान कॉर्पोरेट क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये, आत्मविश्वास आणि प्रत्यक्ष अनुभव देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (MIT-WPU Placements 2026)
प्लेसमेंटसाठी विशेष प्रशिक्षण
कंपन्यांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन एमआयटी-डब्ल्यूपीयूने विद्यार्थ्यांची प्लेसमेंट तयारी अधिक मजबूत केली आहे. यासाठी विशिष्ट क्षेत्राशी संबंधित बूटकॅम्प्स, असेसमेंट तयारीचे विशेष मॉड्यूल्स आणि उद्योगांच्या बदलत्या गरजांनुसार कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक मूल्यमापन, केस-बेस्ड असेसमेंट आणि मुलाखतींच्या विविध फेऱ्यांमध्ये चांगली कामगिरी करण्यास मदत झाली. (MIT-WPU Placements 2026)