मुंबई : (Vinoba Platform) राज्यातील शासकीय शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी आणि शिक्षक, विद्यार्थी तसेच पालक यांना एकाच डिजिटल व्यासपीठावर आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या 'विनोबा' या तंत्रज्ञानाधारित शैक्षणिक उपक्रमाला मोठे यश मिळाले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) आणि ओपन लिंक्स फाउंडेशन (ओएलएफ) यांच्या सामंजस्य करारातून सुरू झालेल्या या उपक्रमाचा विस्तार राज्यभर करण्यात येत असून, आतापर्यंत ३१ लाखांहून अधिक विद्यार्थी, १ लाख ३० हजार शिक्षक आणि ४५ हजार शासकीय शाळा या व्यासपीठाशी जोडल्या गेल्या आहेत.(Vinoba Platform)
'विनोबा' उपक्रमाच्या माध्यमातून मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान (एफएलएन), जीवनकौशल्य विकास, शिक्षक सक्षमीकरण आणि शाळा-पालक संवादाला नवे बळ मिळाले आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, नवोदय विद्यालय प्रवेश, एनएमएमएस आणि नासासह विविध स्पर्धा परीक्षांसाठी सराव चाचण्या उपलब्ध करून देण्यात आल्या. परिणामी या परीक्षांमधील यशाचे प्रमाण १५ टक्क्यांहून अधिक वाढल्याची नोंद झाली आहे.(Vinoba Platform)
एफएलएन अभियानांतर्गत चार जिल्ह्यांतील १.३ लाख विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले असून, निपुण भारत उद्दिष्टांच्या पूर्ततेत २३ टक्क्यांची सुधारणा दिसून आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि सर्जनशीलता वाढविण्यासाठी कथाकथन, कविता सादरीकरण आणि स्पोकन इंग्रजी यांसारखे उपक्रम नियमित राबविले जात असून, दरमहा ५० हजारांहून अधिक विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होत आहेत. 'नन्हे सितारे' या उपक्रमामुळे १५ जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले आहे.(Vinoba Platform)
शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण कार्याचा गौरव करण्यासाठी २५ जिल्ह्यांमध्ये 'कॉफी विथ सीईओ'सह १,१०० हून अधिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या डिजिटल प्रणालीमुळे शिक्षकांच्या प्रशासकीय कामकाजात मोठी सुलभता निर्माण झाली असून, १.१ कोटी तासांहून अधिक वेळेची बचत झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.(Vinoba Platform)
एससीईआरटी आणि ओएलएफ यांच्यातील नव्या सामंजस्य करारानुसार पालकांचा सहभाग वाढविणे, शाळा व्यवस्थापन समित्या सक्षम करणे, विद्यार्थी क्लब, विद्यार्थी पोर्टफोलिओ, माजी विद्यार्थी नेटवर्क आणि जीवनमूल्य शिक्षणासाठी स्वतंत्र डिजिटल पोर्टल विकसित करण्यात येणार आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित मूल्यमापन प्रणाली विकसित करून कविता, कथाकथन आणि स्पोकन इंग्रजीसारख्या उपक्रमांचे स्वयंचलित मूल्यमापनही केले जाणार आहे.(Vinoba Platform)
सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून गुणवत्तापूर्ण, विद्यार्थीकेंद्रित आणि परिणामकारक शिक्षण व्यवस्था उभारण्याच्या राज्य शासनाच्या प्रयत्नांना 'विनोबा' उपक्रमामुळे नवे बळ मिळत असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.(Vinoba Platform)