मराठी संगीत नाट्य महोत्सवात सर्वोत्तम चार नाटकांचा समावेश; ११ ऑगस्ट पासून ३४ व्या मराठी संगीत नाट्य महोत्सवाला प्रारंभ

नेहरू सेंटरचा ३४ वा मराठी संगीत नाट्य महोत्सव; चार दर्जेदार संगीत नाटके प्रेक्षकांना विनामूल्य पाहता येणार

    03-Aug-2026
Marathi Sangeet Natya Mahotsav
 
मुंबई : (Marathi Sangeet Natya Mahotsav) मराठी नाटकाला अनेक दशकांचा इतिहास आहे. या वाटचालीमध्ये संगीत रंगभूमीने खऱ्या अर्थाने महाराष्ट्राबरोबर संपूर्ण जगाला समृद्ध केलेले आहे. आजही ही कला महाराष्ट्राच्या विविध भागात उत्स्फूर्तपणे सादर केली जाते. सर्वोत्तम ठरणारी संगीत नाटके ही प्रेक्षकांना पहाता यावीत यासाठी वरळीच्या नेहरू सेंटरच्या वतीने प्रत्येक वर्षी 'मराठी संगीत नाट्य महोत्सव' चे आयोजन केले जाते.
 
यंदा सुद्धा ३४ व्या महोत्सवाचे आयोजन ११ ते १४ ऑगस्ट २०२६ या दरम्यान केले आहे. सर्वोत्तम म्हणावीत अशी चार दर्जेदार, लोकप्रिय, पारितोषिक प्राप्त संगीत नाटके वरळीच्या नेहरू सेंटरच्या आलिशान नाट्यगृहात प्रेक्षकांना विनामूल्य पहायला मिळणार आहेत. दररोज संध्याकाळी ६ वाजता प्रेक्षकांना या महोत्सवाचे साक्षीदार होता येईल. (Marathi Sangeet Natya Mahotsav)
 
मंगळवार, ११ ऑगस्ट या दिवशी 'संगीत पद्माराणी' हे नाटक सादर केले जाणार आहे. त्यासाठी पुण्याच्या 'भरत नाट्य संशोधन मंदिर' या संस्थेला निमंत्रित केलेले आहे. रमेश नाईक लिखित या नाटकातील नाट्यपदे व रंगावृत्ती संजय डोळे यांनी केले असून त्याचे दिग्दर्शन संजय नरहर यांनी केलेले आहे. आशिष केसरकर यांच्या दिग्दर्शनात सादर होणाऱ्या या नाटकात ऐश्वर्या भोळे, अजिंक्य कुलकर्णी, विश्वास पांगारकर, कौशिक कुलकर्णी यांच्यासह आणखीन दहा कलाकारांचा सहभाग आहे. दुसऱ्या दिवशी बुधवार, १२ ऑगस्ट, स्वर्गीय अनंत दामले यांच्या १११ व्या जयंतीचे निमित्त घेऊन मृदुला दामले यांच्या संकल्पना, निर्मितीत 'संगीत अनंत नारद' ही विशेष कलाकृती सादर केली जाणार आहे. डॉ. वर्षा भावे यांचे लेखन, दिग्दर्शन, संगीत या नाटकाला लाभलेले आहे.(Marathi Sangeet Natya Mahotsav)
 
अमोल बावडेकर, रोहन देशमुख, ओंकार प्रभूघाटे, केतकी भावे-जोशी, संपदा माने, प्रयाग दामले यांचा या कलाकृतीमध्ये सहभाग आहे. गुरुवार, १३ ऑगस्ट 'संगीत मत्स्यगंधा' ही प्रा. वसंत कानेटकर यांची सर्वोत्तम कलाकृती प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. दिग्दर्शन, नेपथ्य तथा कार्यकारी निर्माता बाळ पुराणिक यांनी या नाटकाची धुरा सांभाळलेली आहे. सावंतवाडीच्या 'श्री परमेश्वर प्रोडक्शन'ने या नाटकाची निर्मिती केलेली आहे. स्वर्गीय पं. जितेंद्र अभिषेकी यांचे संगीत या नाटकाला लाभलेले आहे. स्वप्निल गोरे, गणेश दीक्षित, तेजस प्रभूदेसाई, गुरुप्रसाद चिटणीस यांच्यासोबत अनेक कलाकारांचा या नाटकात सहभाग आहे. शुक्रवार, १४ ऑगस्ट, महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी रत्नागिरीच्या 'खल्वायन' निर्मित 'संगीत शांतीब्रह्म' हे नाटक सादर केले जाणार आहे.(Marathi Sangeet Natya Mahotsav)
 
डॉ. श्रीकृष्ण जोशी लिखित या नाटकाचे दिग्दर्शन मनोहर जोशी यांनी केले असून विजय रानडे यांचे संगीत या नाटकाला लाभलेले आहे. स्मिता करंदीकर, मंदार गोखले, श्रीनिवास जोशी, श्रीकांत भाटवडेकर, अर्चना जोशी आदी कलाकारांसोबत अन्य आठ कलाकारांचा यात सहभाग आहे. वादक कलाकारांचा मोठा ताफा या निमित्ताने या महोत्सवात सहभागी होणार आहे. महोत्सवाच्या विनामूल्य प्रवेशिका गुरुवार, ६ ऑगस्ट २०२६ पासून नेहरू सेंटर सभागृहाच्या आरक्षण खिडकीवर सकाळी १०.३० वाजल्यापासून प्रवेशिका उपलब्ध असेपर्यंत दिल्या जातील.(Marathi Sangeet Natya Mahotsav)
 
 




संबंधित मजकूर