जळगाव (bharadi river flood) : चाळीसगाव तालुक्यातील भवाळी गावात सोमवार, दि. ३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री कोसळलेल्या पावसाने पूरस्थिती उद्भवली असून एकूण ५८ कुटूंबाला याचा फटका बसला आहे. दरम्यान, प्रशासनाने खबरदारी घेत घटनास्थळी मदतकार्य पोहोचविण्यास सुरुवात केली आहे. बाधित पूरग्रस्तांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.
चाळीसगाव भवाळी येथे मुसळधार पावसाने भराडी नदीला पूर आला, यात ५८ कुटुंबे उघड्यावर आली. 'गेल्या ५० वर्षांत अशी भीषण पूरपरिस्थिती उद्भवलेली नव्हती', असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या पूरात भवाळी ग्रामस्थांचा संसार, जनावरांसह त्यांचा चारा, धान्यही पूरात वाहून गेल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.
एक हात मदतीचा...
आज बहाळ, खेडगाव आणि भवाळी येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या २०० हून अधिक कुटुंबांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन जीवनावश्यक व संसारोपयोगी वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
काल नुकसान पाहणी करताना अनेक कुटुंबांच्या डोळ्यांत भीती, वेदना आणि उद्याची चिंता पाहिली. त्या… pic.twitter.com/3Rx6pdqhcE
आमदार मंगेश चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, "बहाळ, खेडगाव आणि भवाळी येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या दोनशेहून अधिक कुटुंबांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन जीवनावश्यक व संसारोपयोगी वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले."
ते म्हणाले, "काल नुकसान पाहणी करताना अनेक कुटुंबांच्या डोळ्यांत भीती, वेदना आणि उद्याची चिंता पाहिली. त्या वेळी मी दिलेला शब्द आज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. ही मदत मोठी नाही, फुल ना फुलाची पाकळी म्हणून संकटात असलेल्या माझ्या चाळीसगाव वासियांसाठी केलेला एक छोटासा प्रयत्न आहे. चाळीसगाव माझ्यासाठी फक्त मतदारसंघ नाही, हे माझे कुटुंब आहे."
काल चाळीसगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भवाळी, खेडी आणि खेडगाव परिसरातील नदीला आलेल्या पुरामुळे अत्यंत वेदनादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठावरील तसेच गावातील अंदाजे १०० ते १२० झोपड्या आणि पक्क्या घरांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
"चाळीसगाव तालुक्यातील कुणीही व्यक्ती उपाशीपोटी राहत असेल, संकटात असहाय उभी असेल, तर त्याचे सर्वात जास्त दुःख मला होते. गरिबी मी जवळून पाहिली आहे. कष्ट काय असतात, उद्याच्या भाकरीची चिंता काय असते, याची जाणीव मला आहे. म्हणूनच या संकटाच्या काळात प्रत्येक गरजू कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे. शासनाकडून देखील नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मी पूर्णपणे कटीबद्ध आहे. पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून, प्रत्येक महापूरग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार आहे.", असेही ते म्हणाले.
प्रशासनाकडे मदतीची मागणी
गेल्या ५० वर्षांत असा पूर आम्ही कधी पाहिला नाही, आमचा संसार, जनावरे, त्यांचा चारा, धान्य वाहून गेले असल्याची तक्रार पूरग्रस्तांनी केली आहे. आमच्या मुलाबाळांचे खाण्यापिण्याचेही हाल होत आहेत. त्यामुळे तातडीने पंचनामे करावेत आणि आम्हाला सर्वोतोपरी मदत करावी, अशी मागणी पूरग्रस्तांनी केली आहे.