मुंबई (CJP Foreign Funding Probe) : लोकशाहीमध्ये एखाद्या विषयावर निषेध व्यक्त करण्याचा अधिकार नागरिकांना आहे. मात्र, काही संघटना देशातील युवकांना आणि विद्यार्थ्यांना हाताशी धरत चुकीचे काम करून देशाला अस्थिर करण्याचे काम करू इच्छितात. या कामासाठी त्या संघटनांना फॉरेन फंडिंग मिळते. या फॉरेन फंडिंगचा वापर कशासाठी केला जातो याचा तपास सुरु आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शनिवारी दिली.
माध्यमांशी बोलताना राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले की, "सीजेपी किंवा इतर कार्यरत असलेल्या संस्था किंवा संघटनांना फॉरेन फंडिंग मिळते. या फॉरेन फंडिगचा वापर या संघटना कुठल्या कामासाठी करतात? या संघटना हे फंडिग सकारात्मक कामाकरिता वापरत असल्यास ती स्वागतार्ह बाब आहे. परंतू, देश किंवा राज्य समाज अस्थिर करण्यासाठी काही संघटना याचा वापर करत असतील तर, निश्चितपणे त्याची चौकशी करण्यात येईल. केंद्र स्तरावर ईडीमार्फत याबाबतची तपासणी सुरु असून महाराष्ट्रातही याबाबतची चौकशी सुरु झाली आहे." (CJP Foreign Funding Probe)
ते पुढे म्हणाले की, "मागच्या काळात नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे कार्यरत असलेल्या संस्थेला मोठ्या प्रमाणात फॉरेन फंडिंग प्राप्त झाल्याचे निदर्शनास आले असून त्याचा वापर चुकीच्या कामासाठी करण्यात आला होता. त्यावर सरकारच्या वतीने कारवाई करण्यात आली. इतर संघटनांच्या वतीने अशा पद्धतीचे चुकीचे काम होता कामा नये, याची काळजी सरकारच्या वतीने घेण्यात येईल. यात फक्त सीजेपी हा घटक नसून ज्या संस्था किंवा संघटनांना फॉरेन फंडिग प्राप्त झाले आणि त्यांनी याचा वापर चुकीच्या कामांसाठी केला याची तपासणी पोलिस प्रशासनाच्यामार्फत सुरु आहे." (CJP Foreign Funding Probe)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....