मुंबई (अभिनंदन परुळेकर) : Pro Govinda Season 4 एस.व्ही.पी.डोम,एन.एस.सी.आय., वरळी, मुंबई येथे २५ ते २७ ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या प्रो गोविंदा ‘सीझन चार’ च्या चषकावर सलग दुसऱ्यांदा नागपूर निंजास् संघाने (आर्यन्स गोविंदा पथक) विजयाची मोहोर उमटवली. प्रो गोविंदा सीझन ४ चे ब्रॅण्ड ॲम्बेसेडर सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते विजेत्या संघाला ७५ लाख रुपयांचा धनादेश व ट्रॉफी देऊन सन्मानित केले.यावेळी परीवहन मंत्री प्रताप सरनाईक, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक, प्रो गोविंदा लीगच्या संचालिका कश्मीरा सरनाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रो गोविंदा सीझन ४ च्या स्पर्धेत द्वितीय पारितोषिक नाशिक रेंजर्स संघाला (जय जवान गोविंदा पथक) रुपये ५० लाख व ट्रॉफी, तृतीय पारितोषिक अलिबाग नाईट्स संघाला (बाल उत्साही गोविंदा पथक) रुपये २५ लाख व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. उर्वरित सहभागी संघांना प्रत्येकी ३ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. (Pro Govinda Season 4)
“गोविंदांची जिद्द, समयसूचकता, धैर्य, एक संघ भावना व सर्वोत्तम प्रदर्शन यामुळे यंदाचे पर्व उत्साहवर्धक आणि रोमांचकारी ठरले. प्रो गोविंदा सीझन ४ पुर्वेश सरनाईक व त्याच्या टीमने अतिशय दिमाखात पार पाडला. याबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन! गोविंदा या खेळाला जागतिक व्यासपीठावर पोहोचवणे हे आमचे ध्येय असून या ध्येयपूर्तीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू. पुन्हा भेटुयात पुढच्या वर्षी, नव्या जोशात, नव्या उमेदीने.”अशी प्रतिक्रीया यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या एक्स हँडलवरून दिली." मातीपासून मॅटपर्यंत हा प्रवास आता जागतिक व्यासपीठाकडे "असे पुर्वेश सरनाईक म्हणाले. (Pro Govinda Season 4)